ठाणे – ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कासारवडवली भागातील मुंबई मेट्रो लाईन ४ चे एमएमआरडीएच्या माध्यमातून काम सुरू आहे. या मर्गिकेच्या उभारणीदरम्यान नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑईल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा दरम्यान दोन्ही वाहिन्यांवर २२ जून ते १४ जुलै या कालावधीत तुळई बसविण्याची काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे रात्री ११ ते पहाटे ४ या कालावधीत घोडबंदर रस्ता जड – अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर हलक्या वाहनांची वाहतूक सेवा रस्त्यांनी वळविण्यात येणार आहे. यामुळे या कालावधीत वाहतूक कोंडी होण्याची मोठी शक्यता आहे.
ठाणे शहरात प्रवेश करण्यासाठी तसेच बाहेर पाडण्यासाठी घोडबंदर रस्ता अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. यामध्ये प्रामुख्याने जड – अवजड वाहनांची देखील वाहतूक होते. यामुळे या मार्गावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. असे असतानाच आता या रस्त्यावरून जात असलेल्या मेट्रो – ४ मार्गिकेवर तुळई बसविण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे-घोडबंदर मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र या वाहतूक बदलामुळे येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हा वाहतूक बदल २२ जून २०२५ रोजीपासून १४ जुलै २०२५ रोजीपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत राहणार आहे. यामध्ये पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, प्राणवायू वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवांतील वाहनांना वगळण्यात आले आहे. वाहनचालक आणि नागरिकांनी या काळात जाहीर केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे वाहतूक विभागाने केले आहे.
या मार्गावरील गायमुख मेट्रो स्टेशनजवळ तुळई उभारणीच्या कामासाठी ठाणे-घोडबंदर दिशेने जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना पुढे जाण्यास ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून ते पिलर क्रमांक ८५ जवळून विरुद्ध दिशेने वळतील आणि घोडबंदर-ठाणे मुख्य मार्गावरून पुढे जाऊन पिलर क्रमांक १०२ येथे डाव्या बाजूस वळून इंडियन ऑईल पंपसमोरून मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जाता येणार आहे. तर या कामाच्या दरम्यान हलकी वाहने पिलर क्रमांक ८५ जवळून सेवा मार्गे इंडियन ऑईल पंपसमोर मुख्य रस्त्यावर येऊन पुढे जातील.
तसेच घोडबंदर-ठाणे वाहिनीवर नागलाबंदर परिसरात तुळई बसवण्याचे काम सुरू असताना ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नागलाबंदर सिग्नल व आशा वाईन शॉपजवळून ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून नागलाबंदर येथील डिपी क्रमांक ७२, ७३ व आशा वाईन शॉपजवळून सेवा मार्गाने लोढा स्प्लेन्ड्रा येथे घोडबंदर-ठाणे मुख्य रस्त्यावर येऊन पुढील प्रवास करता येईल.