ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अवजड तसेच हलक्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या भागाच्या रुंदीकरणाचे काम आता मार्च २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. येथील रस्ता रुंद झाल्यास वाहन चालकांना आठ पदरी मुख्य मार्गिका आणि दोन-दोन पदरी सेवा रस्ता उपलब्ध होणार आहे. मागील चार वर्षांपासून या महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे सुरु आहेत. परंतु पावसाळा, वाहतुक बदल, वाहतुक कोंडी, विविध विभागाच्या परवानग्या यामुळे अद्यापही येथील कामे पूर्ण झालेली नाहीत.

मुंबई नाशिक महामार्गालगतच्या भिवंडी शहरात गोदामे, कारखाने मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामुळे उरण जेएनपीए, नाशिक, परराज्यातील विविध भागातून अवजड वाहने मुंबई नाशिक महामार्गाने भिवंडी गाठतात. तसेच कल्याण येथून मुंबई, ठाणे, नवी मुंबई गाठण्यासाठी नोकरदार या महामार्गावरुन वाहतुक करतात. खड्डे, रस्त्यांची कामे यामुळे दररोज महामार्गावर वाहतुक कोंडी होत असते. आता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग भिवंडीतील आमने येथून याच मार्गाला जोडला गेल्याने महामार्गावरील वाहनांचा भार वाढला आहे.

मुंबई नाशिक महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारित आहे. या विभागाला दुरुस्ती शक्य नसल्याने २०२१ मध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या मार्गावरील माजिवडा ते वडपे या भागाच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. अनेकदा मुदत उलटूनही हा रस्ता अद्याप पूर्ण होऊ शकला नाही.

एमएसआरडीसी विभागातील सुत्रांच्या माहिती नुसार हा प्रकल्प आता मार्च २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. येथील साकेत पूल, खारेगाव खाडी पूल या मुख्य भागाची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. साकेत पूलाचे काम ऑक्टोबरच्या अखेरीस तर खारेगाव खाडी पूलाचे काम जानेवारी २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. यासह दिवा, मानकोली भागातही काही कामे शिल्लक आहेत. त्यामुळे आता प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२६ झाली आहे.

पावसाळा, वाहतुक कोंडी, वाहतुक बदल, वन विभागासह इतर विभागाच्या कामासाठी परवनाग्या यामुळे प्रकल्पावर त्याचा परिणाम झाला असे सुत्रांनी सांगितले.

सध्या या महामार्गावरील माजिवडा ते वडपे हा रस्ता काही ठिकाणी चार तर काही ठिकाणी दोन पदरी आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होते. रुंदीकरणानंतर आठ पदरी महामार्ग उपलब्ध होणार असून दोन्ही दिशेकडे दोन-दोन पदरी सेवा रस्ता असेल. तसेच महामार्गालगतच्या गावातील नागरिकांसाठी भुयारी मार्गिका उपलब्ध करुन असतील.