ठाणे : पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी सातही दिवस २४ तास उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच रस्त्यावरील गटारावर झाकण नसल्याने कोणतीही दुर्घटना झाली तर गंभीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सुचना केल्या. या बैठकीला अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत, ठाणे जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मध्य रेल्वेचे अधिकारी, महावितरण, आरटीओ, एस टी, टी एम टी, महानगर टेलिफोन निगम, एमआयडीसी, मुंबई मेट्रो, टोरंट वीज कंपनी, महानगर गॅस, इंडीयन रेडक्रॉस, लायन्स क्लब तसेच महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात गटारांवर झाकणे नसल्यामुळे त्यात नागरिक पडून अपघात झाले आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी बांगर यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. सगळी गटारे, त्यांच्या जाळ्या, झाकणे यांची तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यात फुटभर पाणी साचलेले असेल आणि गटाराचे झाकण उघडे असेल तर त्यात पडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यात तेल घालून याची पाहणी करावी, अशा सुचना त्यांनी केल्या. एकही झाकण उघडे दिसले तर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला. दूषित पाण्याच्या तक्रारींची आजवरची ठिकाणे हेरून त्या भागात पाणी शुद्धीकरणाची औषधे वाटणे, साथीच्या आजारांचे प्रादुर्भाव होणारे विभाग लक्षात घेवून प्रतिबंधात्मक उपाय केले जावेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. टँकर, हातपंप, विहीर अशा स्रोतांमधून घेतले जाणारे पाणी तपासावे. दूषित पाणी असेल तर त्याचा वापर बंद करा, अशी सूचनाही त्यांनी दिल्या. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे काम सध्या पूर्ण क्षमतेने सुरू नाही. हे लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आपत्कालीन व्यवस्थेचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त डॉक्टर, परिचारिका उपलब्ध करून द्यावेत, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा >>>ठाणे: वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नाने हरविलेला एक लाख रुपयांचा कॅमेरा विद्यार्थ्याला मिळाला परत

अधिकारी कायम उपलब्ध हवेत

पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी कायम उपलब्ध हवेत. त्यांचे मोबाईल बंद असू नयेत, नेटवर्क मध्ये नाही, रेंज नाही, मोबाईल चार्जिंग संपले अशा कोणत्याही सबबी सांगू नयेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देशही त्यांनी दिले. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी उभारलेले मार्गरोधक आवश्यक तेवढेच ठेवा. म्हणजे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील मॉडेला नाका चौक ते तीन हात नाका येथील मार्गरोधक किमान दोन फुटाने कमी केले तर तिथे कोंडी होणार नाही, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. घोडबंदर सेवा रस्त्यावरील कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करून जास्तीत जास्त मार्ग रहदारीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.

हेही वाचा >>>कल्याणमधील पत्रीपुलाजवळ कंटेनरच्या धडकेत दोन रिक्षांचा चुराडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात कोणत्याही भागात दुरुस्तीसाठी ठरवून वीज पुरवठा बंद केला जाणार असेल तर ती माहिती जिल्हा, पोलीस आणि महापालिका यांच्या आपत्ती कक्षाला आधी द्यावी. आयत्यावेळी वीज पुरवठा खंडित झाला असेल तर कोणत्या भागात वीज नाही, दुरुस्तीला किती वेळ लागेल हेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवावे. म्हणजे ती माहिती अत्यावश्यक यंत्रणांना कळविणे सोपे जाईल. धोकादायक खांब, उघड्या वीज वाहिन्या, डीपी यांची पाहणी करून योग्य ती देखभाल दुरुस्ती केली जावी. नाले सफाई, रस्त्याची कामांवेळी महावितरणचा स्थानिक अधिकारी तिथे हजर असायला हवे, अशा सुचना आयुक्त बांगर यांनी केल्या. काही ठिकाणी महापालिकेच्या खांबांवरून तारा टाकून वीज पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळे ते खांब धोकादायक झाले आहेत. तेथे महावितरणचे खांब टाकण्यासाठी मान्यता मिळाली आहे. निविदा प्रकिया सुरू आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.