ठाणे : शिवसेना (उबाठा) आणि मनसेने सोमवारी पालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्च्यात शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षही सहभागी झाला होता. या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला आणि ठाणेकरांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, भ्रष्टाचार, पाणी समस्या यांसह विविध समस्यांबाबत जाब विचारला.

तसेच पालिकेत अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीची श्वेतपत्रिका काढा, अशी आग्रही मागणी शिष्ट मंडळाने केली. तसेच लाचप्रकरणात अटक असलेले उपायुक्त शंकर पाटोळे आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणावरूनही टीकेची झोड उठवत आयुक्तांना धारेवर धरले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता. शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव, राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव, शहर प्रमुख रवींद्र मोरे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हेही मोर्चा सहभागी झाले होते. हा मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ येताच, या सर्व नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली.

शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, पाणीपुरवठा समस्या, अनधिकृत बांधकाम आणि भ्रष्टाचार यांसह विविध मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. तक्रारीवर योग्य कारवाई न होणे, अनधिकृत बांधकाम प्रकरणातील दोषींवर कारवाई न होणे, तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या बदली न होण्याचे प्रश्नही उपस्थित केले. निवडणूक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांना तात्काळ हटवावे, अशी मागणी करत ती मान्य होईपर्यंत ते कार्यालयातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली.

मात्र आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर ते बाहेर पडले. यानंतर या सर्व नेत्यांनी पालिका मुख्यालयासमोर जमलेल्या नेत्यांना जाहीर सभा घेत उपस्थिताना संबोधित केले

हा मोर्चा राजकीय एकत्रीकरण दाखवण्यासाठी नव्हता, तर ठाणेकरांच्या समस्यांसाठी होता. ठाण्यातील भ्रष्टाचार वाढत चालला आहे. टेंडर निघण्याआधीच कोणाला किती पैसे मिळणार याचे हिशोब होतात. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असे मनसे नेते अभिजित पानसे म्हणाले.

प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हटले, “ठाणेकरांच्या मनात आक्रोश आहे. ठाण्याला भ्रष्टाचारापासून वाचवायचे असेल तर आम्ही एकत्र येणारच. शाही धरण आजही अपूर्ण आहे, कारण टेंडर कोण काढणार यावरच राजकारण सुरू आहे. ठाणेकर तहानलेले आहेत आणि वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. मी जाहिर आव्हान देतो की, ठाणे महापालिकेतील पदावरची अधिकारी योग्य आहेत का हे आयुक्तांनी जाहीर करावे आणित्याची श्वेतपत्रिका जाहीर करा, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

राज्यभर भ्रष्टाचार वाढला असून ठाणे त्यात अग्रेसर झाले आहे. मनपाचे पाच वर्षांचे ऑडिट झालेले नाही, ३३७ कोटींचा हिशेब लागत नाही. गोल्डन गँगने महापालिका गिळून टाकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली कार्यकर्त्यांची घरे तोडली गेली आणि फोडाफोड झाली, असे राजन विचारे यांनी म्हटले.

आयुक्त हतबल नाहीत, तर राज्यकर्त्यांचे बटिक झाले आहेत. ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. जर भ्रष्टाचार करणाऱ्यांना सत्तेवर ठेवले, तर पुढची पिढी माफ करणार नाही. पाणी समस्या, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकाम या सर्व बाबतीत आम्ही लढा देणार आहोत, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी प्रशासनावर हल्ला चढवला.