ghatasthapana 2025 : नवरात्रोत्सवात घटस्थापनेसाठी बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या टोपल्यांचा वापर वर्षांनुवर्षे केला जात आहे. नवरात्रौत्सवानिमित्त बांबूच्या टोपलीची मागणी वाढते. यामुळे बांबू उत्पादक शेतकऱ्यांचेही या कालावधीत उत्पन्न वाढते. शहरात या टोपल्यांची मोठ्याप्रमाणात विक्री व्हावी यासाठी जळगाव, भुसावळ हून मोठ्यासंख्येने बांबू उत्पादक शेतकरी मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमध्ये नवरात्रोत्सवाच्या १५ दिवस आधी दाखल होतात. यंदाही हे बांबू उत्पादक शेतकरी शहरात दाखल झाले आहेत.
नवरात्रौत्सवाला अवघे आठ ते नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदा २२ ऑक्टोबर रोजी घटस्थापना म्हणजेच सर्वत्र देवीचे आगमन होणार आहे. त्यानंतर पुढील नऊ दिवस देवीची उपासना केली जाणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी बांबूच्या टोपलीत माती, गहू आणि तांदूळ पेरण्याची परंपरा आहे. नऊ दिवसाच्या कालावधीत याला अंकुर फुटतात. त्यामुळे नवरात्रौत्सवाच्या कालावधीत बांबूच्या टोपल्यांना मोठी मागणी असते. दरवर्षी जळगाव, भुसावळ येथून बांबू उत्पादक शेतकरी शहरात या टोपल्यांची विक्री करण्यासाठी दाखल होतात.
यंदाही ठाणे जिल्ह्यात मुख्यतः ठाणे, डोंबिवली, कल्याण शहरात हे टोपली विक्रेते दिसून येत आहेत. हे शेतकरी गावाहून येताना काही टोपल्या तयार करून आणतात. या टोपल्यांची कमतरता भासल्यास ते मुंबईतील परळ भागातून बांबू विकत घेतात. त्याबांबूपासून टोपल्या तयार करतात. एका बांबूची किंमत १५० रुपये असते. या एका बांबूमध्ये मध्यम आकाराच्या ८ ते १० टोपल्या बनविल्या जातात.
एक टोपली विणण्यासाठी या शेतकऱ्यांना दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे टोपली तयार करण्यासाठी लागणारा खर्च आणि मेहनत यानुसार या टोपल्यांचे दर ठरविण्यात येतात. छोट्या आकारापासून ते मोठ्या आकाराच्या टोपल्या यावर्षी ३० ते २०० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहेत.सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे तसेच पाऊस देखील अधून मधून कोसळत असल्यामुळे ग्राहकांची संख्या कमी आहे. घटस्थापना जवळ येताच ग्राहकांची संख्या वाढेल अशी शक्यता टोपली विक्रेते विशाल सपकाळे यांनी व्यक्त केली आहे.
खर्च परवडत नाही
गावात टोपली विक्रीमधून पुरेसा खर्च निघत नसल्यामुळे जळगाव, भुसावळहून काही कुटुंबे मुंबई, ठाणे शहरात गेली अनेक वर्षे येत आहेत. यात महिलांचाही समावेश असतो. हे कुटुंब पंधरा ते वीस दिवस शहरातच वास्तव्यास असतात. टोपली विक्रीतून उत्पन्न मिळते त्यातूनच ते आपला दैनंदिन खर्च भागवत असतात. परंतू, अलिकडे आलेल्या प्लास्टीकच्या टोपल्यांमुळे बांबू टोपल्यांच्या विक्रीत घट झाल्यामुळे हा खर्च परवडत नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.