ठाणे आणि कळवा शहरातील वाहतूकीच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचे काम पुर्ण झालेले असले तरी या पुलाच्या लोकापर्णासाठी मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र आहे. नवरात्रौत्सवाच्याआधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भेटीदरम्यान, नवरात्रौत्सवाच्या काळात नवीन खाडी पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. परंतु नवरात्रौत्सव संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही पुलाच्या लोकापर्णासाठी पालिका पातळीवर हालचाली नसल्याचे चित्र आहे. यामुळे कळवा खाडी पुलाचा दसऱ्याचाही मुहूर्त हुकणार ? अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली महापालिकेतील सावळागोंधळ आणि भाजपला चटके

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी दोन खाडी पुल आहेत. त्यापैकी ब्रिटीशकालीन पुल धोकादायक झाल्याने तो काही वर्षांपुर्वीच वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या पुलावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरातील पुलालगतच्या रस्त्यांवर दिवसभर वाहनांच्या रांगा लागतात. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ही कोंडी कमी करण्यासाठी तिसरा खाडी पुल उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या पुलाच्या कामाची मुदत होती. या मुदतीत काम पुर्ण होऊ शकले नव्हते. त्यानंतर करोना काळात मजुर गावी निघून गेल्यामुळे पुलाचे काम काही महिने ठप्प झाले होते. करोना का‌ळ संपताच पालिका प्रशासनानोे पुलाच्या कामाचा वेग वाढविला होता. ऑगस्ट महिनाअखेर पुलाचे काम पुर्ण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने आखले होते. परंतु या वेळेतही काम पुर्ण होऊ शकले नव्हते. तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आलेल्या कळवा खाडीवरील नवीन खाडी पुलाचे अखेर पुर्ण झाले आहे. तरीही त्याचे लोकार्पण होत नसल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीची सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा पुल वाहतूकीसाठी खुला करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा पुल वाहतूकीसाठी खुला झाल्यास जुन्या पुलावरील वाहनांचा भार कमी होऊन ठाणे आणि कळवा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या काहीप्रमाणात कमी होणार आहे. हा पुल वाहतूकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवरात्रौत्सवाआधी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, नवरात्रौत्सवाच्या काळात नवीन खाडी पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. यामुळे या खाडी पुलाचे दसऱ्यापर्यंत लोकार्पण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. प्रत्यक्षात मात्र दोन दिवसांवर दसऱ्याचा सण येऊन ठेपला असतानाही या पुलाच्या लोकार्पणासाठी पालिका पातळीवर कोणतीही हालचाल सुरु नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कळवा खाडी पुलाचा दसऱ्याचाही मुहूर्त हुकणार ? अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे.