ठाणे : कळवा येथे २५ ते ३० वर्षीय एका जुन्या घराचे छत कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोघांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळव्यातील विटावा भागातील सूर्यनगर परिसरात धर्मा निवास ही एक मजली चाळ आहे. ही चाळ २५ ते ३० वर्षे जुनी आहे. या चाळीत शनिवारी रात्री एक विचित्र अपघात घडला. चाळीतील तळ मजल्यावरील खोली क्रमांक ४ मधील छत कोसळले.

जयश्री शिंदे हे या खोलीत भाडेकरू म्हणून राहत होत्या. या घराचे छत इतक्या मोठ्याप्रमाणात कोसळले की, त्या घराच्या वरच्या खोलीतील दोन व्यक्ती फ्लोअरिंगसहित तळ मजल्यावरील खोलीत पडले. संजय उत्तेकर (४०) आणि योगिता उतेकर असे अपघात झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीम तडवी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पीकअप वाहनासह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता, अग्निशमन दलाचे जवान ०१- इमर्जन्सी टेंडर आणि ०१ – रेस्क्यु वाहनासह आणि टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सहाय्यक आयुक्त आणि बांधकाम विभागाच्या अभियंता यांच्या सूचनेनुसार टोरंट पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून या चाळीतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

रहिवाश्यांना नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना

या चाळीत २० सदनिका होत्या. त्यामध्ये अंदाजे ४५ ते ५० रहिवाशी राहत होते. यातील ०६ सदनिका रिकाम्या करून सील करण्यात आल्या आहेत. सदर सदनिकांमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित बांधकाम धोकादायक स्थितीत असून बांधकाम विभागाकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.