डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर खाडी किनारी गृहप्रकल्प उभारणाऱ्या स्वामी नारायण सिटी कंपनीच्या विकासकाकडून दोन कोटीची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने खंडणीच्या रकमेतील ११ लाखाचा हप्ता स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे खंडणी मागणाऱ्याचे भाजपाचे नेते माजी मंत्री प्रकाश मेहता, माजी खासदार किरिट सोमय्यांसोबत छायाचित्रे पथकाला आढळून आली आहेत.

राजेश नाना भोईर, सूरज पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकाने त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.

पथक प्रमुख मालोजी शिंदे यांनी सांगितले, हिरजी पटेल हे स्वामी नारायण लाईफ स्पेस एलएलपी कंपनीचे संचालक आहेत. ही कंपनी डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागात विकसन करार, खरेदी खत, साठे करार करून जमिनी खरेदी करून तेथे नवीन गृहसंकुल उभारणीचे काम करते. या कंपनीचे रेतीबंदर खाडी किनारी कार्यालय आहे.

विकासक हिरजी पटेल यांनी डोंबिवलीतील मोठागाव येथील रहिवासी अंकुश कृष्णा गायकवाड यांच्याकडून सात वर्षापूर्वी ५८ गुंठे जमीन मोठागाव खाडी किनारी विकत घेतली. या जमिनीवर चार इमारतींचे बांधकाम पूर्ण करून उर्वरित इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या माध्यमातून विकासकाकडून पैसे काढू असा विचार करून खंडणी मागणाऱ्या राजेश नाना भोईर याने लोकायुक्त, विभागीय आयुक्त, कोकण भवन, सक्तवसुली संचालनालय, संचालक, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्हाधिकारी, माजी मंत्री प्रकाश मेहता, माजी खा. किरिट सोमय्या (राजेश व त्यांच्या मुलाचे मेहता, सोमय्या यांच्या सोबत छायाचित्र) यांच्याकडे विकासक हिरजी पटेल यांच्याविरोधात अर्ज केला.

हिरजी पटेल यांनी मोठागावमध्ये खरेदी केलेली जमीन पुन्हा मौजे मोठागाव, ठाकुर्ली येथील गावकऱ्यांच्या नावे करण्याचा विषय अर्जात नमूद केला होता. तक्रार अर्ज घेऊन राजेश भोईरने विकासक पटेल यांच्याशी संपर्क केला आणि तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी आपणास दोन कोटीची खंडणी द्यावी अशी मागणी केली. राजेश आपणास झुलवत आहे, आपले व्यवहार सरळ आहेत. त्यामुळे राजेशला दोन कोटी कशासाठी द्यायचे असा विचार करून विकासक हिरजी पटेल यांनी खंडणी विरोधी पथकाकडे राजेशची तक्रार केली. राजेशने दोन कोटी खंडणीचा तगादा विकासकामागे लावला होता.

खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केल्यानंतर पटेल यांनी राजेशला दोन कोटीपैकी २३ लाख रूपये देतो. अर्ज मागे घे असे सांगितले. २३ लाखाच्या रकमेतील दोन लाखाची रक्कम राजेश भोईरने सूरज पवार या साथीदारामार्फत स्वीकारली. उर्वरित २१ लाख रूपये देण्यासाठी राजेशने पटेल यांच्यामागे तगादा लावला होता. पटेल यांनी त्यांना मोठागाव येथील स्वामी नारायण कंपनीच्या कार्यालयात ११ लाख रूपयांचा हप्ता देण्यासाठी बोलविले. या कार्यालया भोवती पथकाने सापळा लावला होता. ११ लाखाची खंडणी आरोपींनी विकासकाकडून स्वीकारताच पथकाने कार्यालयात दोघांना अटक केली. विष्णुनगर पोलीस ठाण्यात राजेश, सूरजवर विकासक पटेल यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खंडणी विरोधी पथकाचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक संजय शिंदे, उपनिरीक्षक महेश कवळे, विजय राठोड, हवालदार योगीराज कानडे, संजय बाबर, सुहास म्हात्रे, संजय राठोड, देवेंद्र देवरे, भगवान हिवरे यांनी अटकेची कारवाई केली.