ठाणे : राज्यातील एका आमदाराला अश्लील संदेश पाठवून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करुन खंडणी मागणाऱ्या तरुणाला चितळसर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे. मोहन पवार (२६) असे आरोपीचे नाव असून तो महिला असल्याचे भासवून समोरील व्यक्तीशी चॅट करत असे. त्याने यापूर्वी कितीजणांना फसविले आहे याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच यामध्ये काही राजकीय कट कारस्थान आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
आमदारांनी स्वत: याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते २०२४ मध्ये ते विधानसभा मतदारसंघात असताना त्यांच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावरून एक महिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीला त्यांनी त्या काॅलकडे दुर्लक्ष केले. परंतु वारंवार संपर्क होत असल्याने त्यांनी काही वेळाने तो काॅल उचलला. त्यावेळी महिलेने त्यांच्यासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. ती महिला वांरवार त्यांना संपर्क साधू लागली होती. अखेर त्यांनी तिला ब्लाॅक केले. २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरविल्यानंतर त्यांना महिलेने पुन्हा एकदा दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रचारा दरम्यान व्यस्त असताना ती त्यांना दररोज अश्लील छायाचित्र पाठवू लागली होती. आमदारांनी तिला नकार दिला असता, ती त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊ लागली.
खंडणीची मागणी
सुमारे महिन्याभरापूर्वी महिलेने पुन्हा एकदा त्यांना वेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लील छायाचित्र पाठवून तिने पाच ते १० लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार आमदार यांचा राजकीय कारकीर्द संपविणारा असल्याने त्यांनी तात्काळ याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.
होता पुरुष, पण भासवायचा महिला
याप्रकरणाचा तपास चितळसर पोलिसांकडून सुरु होता. खंडणी मागणारी व्यक्ती कोल्हापूर येथील असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोल्हापूर येथून मोहन पवार यालाताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने संबंधित आमदाराला अश्लील संदेश पाठविल्याची कबूली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. ज्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवायचे आहे. त्यांच्याशी तो महिला म्हणून संवाद साधायचा. त्यांना अश्लील छायाचित्र, चित्रीकरण पाठवित असे. त्याने अनेकांचे छायाचित्र इन्स्टाग्राममधून डाऊनलोड केले होते.
कारवाई कोणी केली
ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, साहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे आणि चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक शिरोळे, उपनिरीक्षक जगताप, पोलीस हवालदार पाटील, वारंगडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उघडकीस आणला.
महिला असल्याचे भासवून खंडणी
मोहन हा महिला असल्याचे भासवून त्यांच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर अश्लील छायाचित्र,चित्रीकरण पाठवित असे. त्यानंतर संबंधितांकडून पैसे मागत असे. तो विज्ञान शाखेतील पदवीधर आहे. पूर्वी तो लोणावळा येथील एका उपाहारगृहात सफाई कामे करायचा असे पोलिसांनी सांगितले.