ठाणे : मुंबई वाहतूक पोलिसांना शुक्रवारी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा संदेश मिळाला असून पाठवणाऱ्याने दावा केला आहे की, ३४ वाहनांमध्ये ४०० किलो आरडीएक्स असलेले ३४ “मानवी बॉम्ब” ठेवण्यात आले आहेत. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने आता सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई, ठाण्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. उद्या अनंत चतुर्दशी असल्याने १० दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. सर्व गणेशोत्सव मंडळ, पोलीस प्रशासन, महापालिकांकडून गणेशमूर्ती विसर्जनाची, मिरवणूकीची लगबग सुरु आहे. मुंबई, ठाणे पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त असतानाच आता एक धमकीचा काॅल मुंबई पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे.
धमकीमध्ये काय म्हटले आहे…
मुंबई वाहतूक पोलिसांना शुक्रवारी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा संदेश मिळाला असून पाठवणाऱ्याने दावा केला आहे की, ३४ वाहनांमध्ये ४०० किलो आरडीएक्स असलेले ३४ “मानवी बॉम्ब” ठेवण्यात आले आहेत.जेणेकरून संपूर्ण शहर हादरून जाईल, असे स्फोट घडवून आणले जातील. ‘लष्कर-ए-जिहादी’ संघटनेचा असल्याचा दावा करणाऱ्या या संदेशात असेही म्हटले आहे की, १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत.
ठाणे पोलीस अलर्ट मोडवर
ठाणे पोलिसांकडून गणेशोत्सवानिमित्ताने ठिकठिकाणी बंदोबस्त आहे. असे असताना मुंबईत धमकी आल्याने ठाणे पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील अर्थात ठाणे ते बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत असते. या ठिकाणी देखील साध्या वेशातील पोलीस आणि पोलीस ठाण्यातील कर्मचारी तैनात असतील. तसेच बाॅम्ब शोधक आणि नाशक पथके, श्वान पथकांना देखील पाचारण केले जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून बंदोबस्त
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिसांकडून ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात सुमारे आठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये ११ उपायुक्त, २६ साहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, ७००० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, मुंबई पोलीस दलातील १० पोलीस निरीक्षक आणि पाच साहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेच लोहमार्ग पोलीस दलातील ५० पोलीस कर्मचारी, ८०० गृहरक्षक, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त असणार आहे.