ठाणे : महापालिका निवडणुकांना अद्यापही वेळ आहे. त्यामुळे महायुतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही ठाण्यात भाजपचा महापौर व्हावा असे मत व्यक्त केले. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक वाद सुरु झाले आहेत. शुक्रवारी ठाण्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयात कोकण विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित होते.

बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्याने निवडणुक लढविण्यासाठी पूर्व तयारी करावी लागते ती केली पाहिजे, त्याचा फायदा हा नेहमी महायुतीला होतो असे चव्हाण म्हणाले. महापालिकेच्या निवडणुका अंतिम टप्यात होणार आहे. अद्याप वेळ आहे, त्यामुळे महायुतीचा निर्णय देखील वरीष्ठ पातळीवर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.