ठाणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट परिसरात हप्तेबाजीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिन्याला पाच हजारांसाठी मालकाला सोलून काढण्याची धमकीच एकाने दिली. राजीव गांधी नगर परिसरात हा प्रकार घडला आहे.
गळे इस्टेट येथील राजीव गांधी नगर भागात एका सुरक्षा रक्षकाला सुरा दाखवून धमकाविण्यात आले. तसेच बांधकाम करायचे असल्यास दर महिन्याला पाच हजार रुपयांचा हप्ता देखील मागण्यात आला. याप्रकरणी साईनाथ गवळी या तरुणाविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात मोठया प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. या बांधकामांमधून सुरु असणारी हप्तेबाजी सातत्याने चर्चेत असते. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य टाकणे, कामगारांचा पुरवठा करणे, भंगार साहित्य उचलणे यासाठी देण्यात येणारे ठेके मिळविण्यासाठी स्पर्धा सुरु असते. गांधीनगर येथे एका बांधकाम कार्यालयात सुरक्षा रक्षक काम करतो.
बुधवारी दुपारी साईनाथ गवळी हा त्याठिकाणी आला. त्याच्या हाताकडे एक सुरा होता. ‘वागळे इस्टेट भागात कोणीही बांधकाम करत असेल तर तो मला भेटून पैसे देतो आणि काम सुरु करतो. तुझ्या मालकाला सांग, शांततेत काम करायचे असेल तर दर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील. तसेच पैसे दिले नाही तर मालकाला बोकडा सारखा सोलून काढेल’ अशी धमकी साईनाथ याने दिली. यानंतर सुरक्षा रक्षकाला पकडून मारहाणीचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथील अभियंते आल्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकाची सुटका केली. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाने तक्रार दाखल केली. त्यानंतर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.