Thane News : ठाणे : सण आणि उत्सवानिमित्ताने राज्य परिवहन महामंडळाकडून (st) जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालविण्यात येतात. प्रवाशांचा सुखरूप प्रवास व्हावा यासाठी जादा बसगाड्या सोडण्यात येतात. अशाचप्रकारे रक्षाबंधन सणानिमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सलग तीन दिवस ९१ जादा बस गाड्या विविध मार्गांवर चालविल्या. त्यास प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याने ठाणे एसटी विभाग मालामाल झाला असून त्यांच्या तिजोरीत तीन दिवसात कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे.
यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण शुक्रवार, शनिवार या दिवशी आले होते. या दोन्ही सुट्ट्यांना लागूनच रविवारची सुट्टी आली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाला होणारी गर्दी लक्षात घेत, राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सलग तीन दिवस ९१ जादा बस गाड्या विविध मार्गांवर चालविण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. यात लांब पल्ल्याच्या आणि मध्यम मार्गांवर जादा गाड्यांचे नियोजन आखण्यात आले होते. शुक्रवार ते रविवार या दिवसांमध्ये आगारांमधील एकही वाहन मार्ग बंद राहणार नाही याची काळजी घेण्यात आली. तसेच गर्दी आणि जादा बसगाड्यांचे नियोजन आगार पातळीवर करण्यात आले आणि या दिवसांमध्ये आगार कक्षेतील ज्या मार्गांवर प्रवासी संख्या अधिक आहे, तेथे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
म्हणून जादा बसगाड्या सोडल्या
दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी ) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे जातो आणि त्याकरिता प्रवासासाठी एसटी बसगाड्यांचा वापर करतो. यामुळे गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या सणाच्या कालावधी एसटीला विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. त्यामुळे यंदाही रक्षाबंधन सणानिमित्ताने ८ ते १० ऑगस्ट या तीन दिवसांसाठी नियोजीत बस व्यतिरिक्त ९१ जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालविण्यात आल्या. नियमित २० हजार किलो मीटर वाहतूक होते. पण या तीन दिवसात ४५ हजार किलोमीटर जादा वाहतुकीचे नियोजन आखले होते.
या मार्गांवर बस सोडल्या होत्या
ठाणे १ आगार येथुन स्वारगेट – ४, बोरीवली – ४, मिरा भाईंदर – ३, कराड – ३, कोल्हापूर – १, ठाणे २ आगार येथून स्वारगेट – २, बोरीवली – २, नालासोपारा – २, ठाणे – पनवेल – ३, भिवंडी – ४, कराड – १, कोल्हापूर – १, भिवंडी आगार येथून ठाणे – ४, बोरीवली – २, कल्याण – ४, नगर – २, शहापुर आगार येथून कसारा-नाशिक – ३, ठाणे – २, कल्याण – २, किन्ह्वली – ३, कल्याण आगार येथून नगर – ३, आळेफाटा – ३, आळेफाटा – ३, मुरबाड – ४, भिवंडी – ३, मुरबाड आगार येथून कल्याण – ३, नगर – १, आळेफाटा -३, विठ्ठलवाडी आगार येथून भिवंडी – ३, पनवेल – ३, जव्हार – ३, आळेफाटा – १, वाडा आगार येथून ठाणे – ३, पुणे – २, कल्याण – ३ अशा ९१ जादा बसगाड्या चालविण्यात आल्या.
४ कोटी ६६ लाखांचे उत्पन्न मिळाले
मागील वर्षी नियमित पेक्षा ३९ हजार किलोमीटरच्या अनुषंगाने जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे परिवहन मंडळाच्या तिजोरीत १९ लाख ३१ हजारांचे उत्पन्न जमा झाले होते. यंदाही रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी देखील एसटी थांब्यावर अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या तीन दिवसात एसटीच्या ठाणे विभागाला ४ कोटी ६६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.