ठाणेः राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीतील पक्षांमध्येच स्पर्धा सुरू असल्याचे चित्र राज्यभर दिसते आहे. त्याचवेळी ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिका, नगरपालिकांमध्ये शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष तीव्र होत असताना जिल्हा परिषदेत मात्र भाजपने सन्मानजनक महायुतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याची भूमिका जाहीर केली आहे. भाजपने ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे शहरात एकमेकांविरोधात तर ग्रामीण मध्ये सोबत निवडणूक लढवण्यासाठी भाजप आग्रही असल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्हा परिदेवर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. त्यानंतर शिवसेनेने सत्ता काबिज केली. शेवटच्या निवडणुकीत शिवसेनेने अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर आपापले उमेदवार निवडून आणले होते. त्यावेळी भाजपने त्यांना अप्रत्यक्ष मदतच केली होती. मात्र कालांतराने जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शिवसेना भाजप यांच्यात प्रमुख लढत दिसते आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुरबाडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत शक्तीप्रदर्शन केले होते. जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आणि कामाला लागण्याचे आदेशच त्यांनी दिले होते.
मात्र दुसरीकडे भाजपने ग्रामीण भागात आणि विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीत सावध भूमिका घेतली आहे. भाजपने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी नुकतीत भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील गट निहाय बैठकांमध्ये आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांप्रमाणे महायुतीसाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी भिवंडीतील २१ गट निहाय बैठक घेतली. तर नुकतीच शहापुरातील १२ गटाप्रमाणे बैठक घेण्यात आली. येत्या काळात जिल्हा परिषद निवडणूक कशी लढावी यावर या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आम्ही स्थानिक पातळीवर सन्मानजनक महायुतीची चाचपणी केली आहे. महायुतीतील प्रत्येक पक्षाची स्थिती काय आहे यााबाबत आम्ही चर्चा केली आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेच प्रकाश पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनुसार भेट घेतली. त्यांनीही युतीच्या चर्चेचे सुतोवाच केले आहे. युतीची चर्चा ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपल्याकडे सद्यस्थिती असावी यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. भाजपा महायुतीतून लढण्यासाठी सकारात्मक असून, सन्मानजकन युतीची आम्हाला अपेक्षा आहे, असेही कपिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.