ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला नवे रूप देण्यात आले असून हे संकेतस्थळ आता नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध योजना, उपक्रम आणि सेवांबाबतची सर्व माहिती या संकेतस्थळावर अद्ययावत स्वरूपात उपलब्ध झाले आहे. तर विविध भाषिक नागरिकांना मराठी आणि इंग्लिशसह त्यांच्या मातृभाषेत ही जिल्हा परिषदेच्या योजना आणि इतर उपक्रमांची माहिती घ्यायची असल्यास ती तब्बल २३ भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये उर्दू, कश्मीरी, मैथिली, संस्कृत, संताली यांसह विविध भाषांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी ही प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येते. यामुळे नागरिकांचा त्यातही ग्रामीण भागांचा जिल्हा परिषदेशी थेट संपर्क येतो. यामुळे नागरिकांना याबाबत अद्ययावत माहिती मिळावी म्हणून जिल्हा परिषदेचे संकतेतस्थळ महत्वाचे ठरते. मात्र ठाणे जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ गेल्या अनेक वर्षांपासून बंद होते. यात कोणतेही माहिती दिली जात नसे. यामुळे अनेकदा प्रशासनच्या कारभारावर टीका देखील झाली आहे. मात्र आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे.
नव्या संकेतस्थळावर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची कार्यपद्धती, शासकीय योजना व परिपत्रके, माहितीचा अधिकार कायद्यानुसार आवश्यक माहिती, विविध भरतीसंदर्भातील जाहिराती व सेवा ज्येष्ठता यादी, पंचायत समित्यांची सविस्तर माहिती, नागरिकांसाठी आवश्यक संपर्क क्रमांक तसेच ऑनलाईन तक्रार निवारणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे हे नवे संकेतस्थळ डिजिटलकरण आणि सुशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि माहितीचा सहज प्रवेश या माध्यमातून शासनाचे निर्णय आणि योजना नागरिकांपर्यंत अधिक परिणामकारकरीत्या पोहोचतील. जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केलेला विश्वास असा की, हे संकेतस्थळ खऱ्या अर्थाने नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी मोलाचे ठरेल आणि इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरणार आहे.
भारत सरकारच्या “भाषिणी – राष्ट्रीय भाषांतर अभियान” या उपक्रमाचा समावेशही या संकेतस्थळात करण्यात आला आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ आता २३ भारतीय भाषांमध्ये पाहता येते. मातृभाषेत माहिती मिळाल्याने नागरिकांना शासनाच्या योजना व उपक्रम अधिक परिणामकारक पद्धतीने समजून घेता येणार असून योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल. यामध्ये मराठी, इंग्लिश, आसामी, बंगाली, बडो, डोंगरी, गोवा कोकणी, गुजराती, हिंदी, कन्नडा, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संताली, सिंधी, तमिळ, तेलगू, उर्दू, कश्मीरी, मैथिली, संस्कृत
सर्वांसाठी सुलभता लक्षात घेऊन या संकेतस्थळावर ध्वनीलेखन व मजकूर वाचन या दोन आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. ध्वनीलेखनाच्या मदतीने नागरिकांना टंकन न करता फक्त मायक्रोफोनच्या सहाय्याने आवाजाद्वारे माहिती शोधता येते. विशेषतः वृद्ध व दिव्यांग नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर मजकूर वाचन सुविधेमुळे संकेतस्थळावरील मजकूर थेट आवाजाच्या माध्यमातून ऐकता येतो, ज्यामुळे दृष्टिहीन किंवा वाचनात अडचण असलेल्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या सुरक्षित, विस्तारक्षम आणि सर्वांना सोप्या अशा तंत्रज्ञानावर https://zpthane.maharashtra.gov.in/ हे संकेतस्थळ रचना करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घरबसल्या मिळणार असून सर्व माहिती सहज आणि स्पष्टपणे उपलब्ध होईल. हे संकेतस्थळ नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे. – अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हा परिषद