बदलापूरः गेल्या काही दिवसांपासून बदलापूर पूर्वेतील भुयारी मार्गाजवळचा कात्रप परिसरातील चौक कोंडीचा ठरू लागला आहे. येथे रस्त्याच्या कडेला सुरू असलेले खोदकाम, चारही बाजूंनी येणारी वाहने, त्यांच्या नियमानासाठी नसलेली यंत्रणा यामुळे ही कोंडी होत असून स्थानिक प्रवाशांसह पुणे, कर्जतहून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांनाही याची झळ बसते आहे. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. रविवारीही अशाच प्रकारे वाहतूक कोंडी झाली.
गेल्या काही वर्षात बदलापूर, अंबरनाथ शहरांत मोठ्या प्रमाणावर वाहने वाढली. परिणामी रस्त्यावर त्याचा भार दिसून येतो. या दोन्ही शहरांमध्ये वाहतूक नियंत्रण ही मोठी समस्या उद्भवू लागली आहे. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात काही महिन्यांपूर्वी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल अशी आशा होती. मात्र तरीही कोंडी कायम आहेच. सिग्नलच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी वाहने, सिग्नलच्या ठिकाणी झालेले आणि दुरूस्त न केलेले खोदकाम, बेशिस्त वाहनचालक यामुळे कोंडी सुरूच आहे.
त्यात रविवारी बदलापूर पूर्वेतील कात्रप भाग बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत अडकला. सायंकाळी सहाच्या सुमारास बदलापुरच्या भुयारी मार्गाजवळच्या पूर्वेतील चौकात कोंडी होण्यास सुरूवात झाली. बदलापूर पश्चिमेतून भुयारी मार्गाद्वारे येणारी वाहने थेट चौकातून अंबरनाथ किंवा प्रस्तावित पनवेल मार्गाकडे वळण घेत होती. त्याचवेळी अंबरनाथहून येणाऱ्या वाहनांच्या रांगा या मार्गावर लागल्या. बदलापूरहून अंबरनाथच्या दिशेने जाणारी वाहने याच चौकात अडकून पडू लागली. त्यामुळे या चौकापासून थेट कात्रपच्या जुन्या चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. अनेक स्थानिक प्रवाशांनी उलट दिशेने वाहने वळवून आपली सुटका करून घेतली. मात्र बाहेरच्या गावाहून आलेल्या अनेक वाहनांना खोळंबून राहावे लागले.
रात्री आठपर्यंत ही वाहतूक कोंडी जैसे थे होती. येथे त्यावेळी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती जाणवत होती. मात्र कालांतराने येथे वाहतूक पोलीस आले. तोपर्यंत कोंडी वाढली होती. कात्रप चौकापासून ते थेट कार्मेल शाळेपर्यंत, दुसरीकडे प्रस्तावीत पनवेल महामार्गावर, कर्जत रस्त्यावर कात्रप चौकाकडे, बदलापूर पश्चिमेतील भुयारी मार्गाद्वारे पश्चिमेतील कल्याण बदलापूर रस्त्यावरही या कोंडीच परिणाण जाणवले.खोदकामाने वाढवली डोकेदुखी
सध्या विविध कामांसाठी अंबरनाथ आणि बदलापूर शहरात खोदकाम सुरू आहे. बदलापूर कर्जत मार्गावर या चौकाशेजारीच दोन ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. याच रस्त्यावर पुढे बर्गर किंगसमोर कर्जतच्या मार्गिकेवर रस्ता बंद करण्यात आला होता. कोंडीनंतर तो उघडण्यात आला. यामुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला गेला होता.