लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: दिवा रेल्वे स्थानकातून सोमवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आलेल्या विशेष शटल सेवेला कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांची तुफान गर्दी होती. सोमवारी सकाळी ७.१० वाजता दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहावरुन ही विशेष शटल सोडण्यात आली.
बहुतांशी कोकणातील गणेशभक्त दोन दिवसापूर्वीच कोकणात रेल्वे, मोफत एसटी बससेवेच्या माध्यमातून पोहचले आहेत. त्यामुळे सोमवारची गर्दी यापूर्वीच्या दोन दिवसापूर्वीपेक्षा कमी आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वीचे दोन ते तीन दिवस फलाटावर पाय ठेवण्यास जागा नव्हती, असे अधिकारी म्हणाला.
हेही वाचा… कल्याण-डोंबिवलीत खड्डे, खडीतून गणपती बाप्पांचा प्रवास
गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत प्रवाशांनी सोमवारी सकाळी दिवा-रत्नागिरी विशेष शटलमधून प्रवास सुरू केला. फलाटावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन नये म्हणून रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, रेल्वे अधिकारी, विशेष माहिती कक्ष, प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. दिवा रेल्वे स्थानकातील सरकता जिना सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा सामानाच्या पिशव्या खांद्यावर घेऊन जिने चढ उतर करण्याचा त्रास वाचला आहे.
डोंबिवली-कुडाळ १८ तास
डोंबिवलीतील एक कुटुंब रविवारी पहाटे रस्ते मार्गाने मोटारीने कुडाळ येथे जाण्यासाठी निघाले. परंतु, कासु सोडल्यानंतर रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी यामुळे हे कुटुंब रविवारी रात्री नऊ वाजता कुडाळ जवळील पाटपरुळे येथे पोहचले. हा प्रवास यापूर्वी नऊ तासात पूर्ण होत होता. आता रस्त्यांवरील खड्डे, कोंडीमुळे हा प्रवास चार ते पाच तास उशिराने होत आहे, असे संदीप परुळेकर यांनी सांगितले.