ठाणे: घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाडा उड्डाणपूलाचे येत्या दोन आठवड्यांत लोकार्पण होण्याची शक्यता आहे. हा उड्डाणपूल सुरु झाल्यास या भागात होणाऱ्या वाहतुक कोंडीतून नागरिकांना मोठा दिसाला मिळणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपूलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली आहे. त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे.
ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरीवली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेने हजारो वाहने वाहतुक करतात. तसेच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्ते मार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येत असतो. गेल्याकाही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घोडबंदर मार्गावर वडाळा- घाटकोपर- कासारवडली आणि पुढे गायमुख या ‘मेट्रो चार’ आणि ‘चार अ’ मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, मुख्य रस्त्यांलगत आणि दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्गावरोधक उभारले आहेत. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होतो. घोडबंदर मार्गावर सध्या चितळसर मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ भागात उड्डाणपूल आहेत. परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतुक नेहमी संथ असते.
घोडबंदर मार्गावरील भाईंदर पाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे. तसेच या भागात आणखी एक उड्डाणपूल निर्माणाचे काम एमएमआरडीएने सुरु केले होते. या उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. हा उड्डाणपूल येत्या दोन आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.
उड्डाणपूल सुरु झाल्यास भाईंदरपाडा, नागलाबंदर, गायमुख, कासारवडवली भागात होणाऱ्या कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. उड्डाणपूलाखालून दोन भुयारी मार्गिका जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उड्डाणपूलाखालून वाहतुक करण्यास किंवा मार्गिका ओंलाडता येऊ शकते. त्यामुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसू शकतो.
चौकटघोडबंदर भागात कासारवडवली पूलाच्या उभारणीचे कामही सुरु आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास घोडबंदर मार्गावरील वाहतुक अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे.
चौकटया उड्डाणपूलाची लांबी ६०१ मीटर इतकी आहे. तसेच हा उड्डाणपूल घोडबंदरच्या दिशेने जाण्यासाठी आणि घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येण्यासाठी उपलब्ध असेल. उड्डाणपूलाखाली दोन भुयारी मार्गिका आहे. येत्या दोन आठवड्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती एका अभियंत्याने दिली.