लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली जवळील खोणी पलावा येथे बुधवारी सकाळी एका मोटारीतून आलेल्या तीन भुरट्या चोरांनी एका ७५ वर्षाच्या वृध्दाला लुटले. यामध्ये एक चोरटा साधू वेशात होता. या वृध्दाला बोलण्यात गुंतवुन साधू वेशातील इसमाने वृध्दाच्या गळ्यातील सोन्याची साखळी, अंगठी असा एका लाखाहून अधिक किमतीचा ऐवज घेऊन पसार झाले होते. मानपाडा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या तिन्ही भुरट्या चोरांना अटक केली आहे.

हे तीन जण गुजरात, सोलापूर आणि पुणे भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून वृध्दाचा लुटलेला सोन्याचा एक लाख २० हजार रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज, गुन्ह्यासाठी वापरलेली मोटार कार पोलिसांनी जप्त केली आहे. माधव दिवाकर जोशी (७५) या वृध्दाची चोरट्यांनी काटई बदलापूर रस्त्यावरील खोणी पलावा भागातील रस्त्यावर बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान लुट केली होती.या तिन्ही इसमांना पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेली माहिती, अशी की तक्रारदार माधव दिवाकर जोशी हे वृध्द खोणी पलावा भागात राहतात. खोणी पलावा भागातील वेटलॅन्ड पार्क परिसरातील भाजी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी पायी चालले होते. त्यावेळी त्यांच्या समोरून एक मोटार आली. मोटारीत तीन जण होते. तिघेजण मोटारीतून उतरले. त्यापैकी एक जण साधु वेशात होते.

या तिन्ही भुरट्यांनी माधव जोशी यांची बरीखुशाली विचारली. वृध्द वयात घ्यायची काळजी. आता कोठे चालले अशी विचारणा करत माधव दिवाकर जोशी यांचा विश्वास संपादन केला. माधव जोशी यांना बोलण्यात गुंतवून साधुच्या वेशातील भुरट्याने माधव जोशी यांना काही कळण्याच्या आत हातचलाखी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, बोटातील सोन्याची अंगठीही काढुन घेतली.

तिन्ही भुरटे एकावेळी माधव जोशी यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याशी लबाडी करण्याचा प्रयत्न करत होते. साधु आणि इतर भुरटे यांचा माधव यांच्या बरोबर संवाद सुरू असतानाच, भुरटे बोलत बोलत त्यांच्या मोटारीजवळ गेले. वृध्द आपला काढुन घेतलेला सोन्याचा ऐवज परत मागत होते. पण ते देण्याच्या मनस्थितीत नव्हते. तिन्ही भुरटे घाईघाईत त्यांच्या मोटारीजवळ गेले आणि कोणाला संशय येणार नाही, आपले पकडले जाऊ या भीतीने मोटारीत बसून पळून गेले. साधु वेशातील इसमांनी आपल्याला लुटल्याची तक्रार माधव जोशी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तिन्ही भुरट्यांना गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड, जयपाल गिरासे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, संपत फडोळ, सागर चव्हाण, हवालदार राजेंद्रकुमार खिलारे, सुनील पवार, सचिन साळवी, विकास माळी, सोपान शेळके, गणेश भोईर, सुशांत पाटील, यल्लपा पाटील, गणेश बडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.