शहापुर : तालुक्यातील अस्नोली येथे अन्नातून विषबाधा झाल्याने तीन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. काव्या(१०), दिव्या (८) आणि गार्गी भेरे (५) अशी मुलींची नावे असून त्यांना सोमवारी अन्नातून विषबाधा झाली होती. यापैकी दोघींवर नायर आणि एका मुलीवर घोटी येथील एसएमबीटी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

तिघींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर भेरे कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. तिघींच्या मृत्यूप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी याप्रकरणी संशय व्यक्त केला आहे.

शहापुर लगत असलेल्या चेरपोली येथील संदीप भेरे यांची पत्नी तीन मुलींसह गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्यातील आस्नोली येथे तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी २१ जुलैला काव्या, दिव्या व गार्गी या तिघींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने मुलींच्या आईने आस्नोली येथील खासगी डॉक्टर आणि त्यानंतर शहापुर उप जिल्हारुग्णालयात दाखल केले. मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघींना मुंबईच्या नायर आणि एका मुलीला घोटी येथील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपचारा दरम्यान यामधील काव्या आणि गार्गी यांचा गुरुवारी तर दिव्या हिचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल अशी माहिती किन्हवली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली.