ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या महापौरांच्या आदेशाला अभियंत्यांची केराची टोपली

किशोर कोकणे, लोकसत्ता
ठाणे : गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही शहरात पालिका प्रशासनाला खड्डे बुजविणे अद्यापही शक्य झाले नाही. शहरातील कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, तीन हात नाका, वागळे इस्टेट, नौपाडा भागांत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव आगमन मिरवणुका खड्डय़ांतून काढण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच महापौर नरेश म्हस्के यांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र या आदेशालाही महापालिकेच्या अभियंत्यांनी केराची टोपली दाखविली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने या वर्षीही गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहे. तसेच नियमांचे पालन करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या निर्बंधांविषयी गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी असली तरी गणेशोत्सवासाठी मंडळांनी तयारी सुरू केली आहे. ठाणे शहरात घरगुती गणपतींचे आगमनही मोठय़ा प्रमाणात होत असते. गणेशमूर्तीचे आगमन खड्डय़ांतून होऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वीच महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही महापालिकेकडून खड्डे बुजविण्यात आलेले नाही.

ठाणे शहरातील नितीन कंपनी चौक, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका मुख्य आणि सेवा रस्ते, नौपाडा, वागळे इस्टेट, कापूरबावडी, साकेत पूल या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच ज्या रस्त्यांवर महापालिकेने खड्डे बुजविले होते. त्या रस्त्यांवर पावसामुळे पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. गणपती आगमनाच्या मिरवणुका छोटे टेम्पो, कारमधून काढल्या जातात. त्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता गणेशोत्सव मंडळांकडून व्यक्त केली जात आहे.

गणेशमूर्ती मातीच्या आणि पर्यावरणपूरक असाव्यात, असे आवाहन नेहमी राज्य सरकारकडून केले जाते. त्यानुसार काही मंडळे आणि नागरिकांनी मातीच्या गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र मिरवणूक काढताना एखादा खड्डा आल्यास मातीच्या मूर्तीला धक्का लागून त्या फुटण्याची शक्यता अधिक असते. महापालिकेनेही चांगले रस्ते बांधणे अपेक्षित असते. परंतु शहरात खड्डे कायम आहे. महापालिकेने खड्डे बुजविले नाहीतर आंदोलन केले जाईल.

– समीर सावंत, अध्यक्ष, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्था