आकांक्षा मोहिते, लोकसत्ता

ठाणे : करोनामुळे दोन वर्षे बंद असलेल्या ठाण्याच्या मासुंदा तलावातील नौकाविहाराला आता उत्तम प्रतिसाद मिळत आहे. करोनाचे निर्बंध हटवल्याने उन्हाळय़ाच्या सुट्टीत ठाणेकर नागरिक आणि ठाणे शहरात येणाऱ्या पर्यटकांचा मासुंदा तलावातील नौकाविहार करण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. दर दिवसाला सरासरी ९० ते १०० तर सुट्टीच्या दिवशी ४०० ते ४५० पर्यटक मासुंदा तलावातून नौकाविहार करत आहेत, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली.

ठाणे रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेला मासुंदा तलाव हे नेहमीच ठाणेकरांचे विरंगुळय़ाचे ठिकाण राहिले आहे. या तलावाभोवतीच्या तलावपाळीवर सायंकाळी गर्दी होत असते. सुट्टीच्या दिवशी घोडागाडीतून फिरण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ चाखण्यासाठी येथे झुंबड उडालेली असते. या तलावात सायंकाळी चार ते रात्री नऊदरम्यान नौकाविहाराची सुविधाही पुरवण्यात आली आहे.  करोनाच्या काळात ही सुविधा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून नौकाविहार पुन्हा सुरू झाले असून त्याला नागरिक-पर्यटक यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सद्य:स्थितीला उन्हाळय़ाची सुट्टी असल्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक नौकाविहाराचा आनंद लुटत आहेत. दिवसाला ९० ते १०० पर्यटक तर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी ४०० ते ४५० पर्यटक पॅडल, नॅनो, फॅमिली, कार अशा सर्व बोटींमधून नौकाविहार करत आहेत, अशी माहिती नौकानयन व्यवस्थापनाने दिली. 

लहान मुलांसाठी आकर्षण

यंदा लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांचे मनोरंजन करण्यासाठी खास टॉय ट्रेन आणि जिम्पग जॅक या ठिकाणी उपल्बध करून दिला आहे. यामध्ये १ वर्ष ते १० वर्षांपर्यंतची बच्चे कंपनी याचा आनंद घेऊ शकत आहे.

* दर  पॅडल बोट- ७० रुपये(प्रति व्यक्ती)

* मशीन बोट- ३० रुपये (प्रति व्यक्ती) लहान मुलांची पॅडल बोट- ३० रुपये (प्रति व्यक्ती) नॅनो बोट- १८० रुपये (दोन व्यक्ती)

मागील दोन वर्षांपासून करोनामुळे नौकाविहार सेवा बंद होती. यंदा करोनाचे निर्बंध हटवल्याने ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना मासुंदा तलावाची सफर अनुभवायला मिळत आहे. तसेच नौकाविहार करण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे.   

– दीनानाथ ठाणेकर, व्यवस्थापक, प्रिसिजन फिशरीज