कल्याण – मद्यपान करून रिक्षा चालवित असलेल्या एका रिक्षा चालकाला कल्याण वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागातील चौकात शुक्रवारी दुपारी पकडले. हा रिक्षा चालक मद्यपान केल्याने बेभान झाला होता. त्यामुळे तो वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवक यांना धक्काबुक्की करत मी दारू प्यायलो नाही. मला पकडू नका, अशी अरेरावीची भाषा करत होता.

मद्यपी रिक्षा चालकाला वाहतूक पोलिसाने पकडून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून पोलीस ठाण्यात येण्यास नकार देऊ लागला. या मद्यपीने काही वेळ वाहतूक पोलिसांबरोबर झटापटी केली. मी काही केले नसताना तुम्ही मला का पकडत आहात, असे प्रश्न तो जोरजोराने ओरडत वाहतूक पोलिसाला करत होता.

कल्याण पश्चिमेत बैलबाजार भागात कल्याण वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवक वाहतूक नियोजनाचे काम शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान करत होते. त्यावेळी त्यांना कल्याण रेल्वे स्थानक भागातून येत असलेला रिक्षा चालक भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे रिक्षा चालवित असल्याचे निदर्शनास आले. हा रिक्षा चालक अन्य वाहन चालक किंवा पादचाऱ्यांना रिक्षा धडकवून अपघात करण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्या रिक्षा चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला तर तो रिक्षा चालक वेगान पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला.

त्यावेळी संंबंधित रिक्षा चालक दारू पिऊन रिक्षा चालवित असल्याचे वाहतूक पोलिसाच्या लक्षात आले. वाहतूक पोलिसाने मद्यपी रिक्षा चालकाला थांबविण्याचा इशारा करूनही रिक्षा चालक रिक्षा थांबविण्यास तयार नव्हता. वाहतूक पोलिसाने पळत जाऊन मद्यपी रिक्षा चालकाची रिक्षा रोखून धरली. माझी रिक्षा तुम्ही का रोखून धरली आहे. तुम्ही मला सोडा, अशी दटावणीची भाषा तो वाहतूक पोलिसाबरोबर करू लागला. तो पुन्हा रिक्षा घेऊन पळून जात होता.

पण वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवकाने मद्यपी रिक्षा चालकाला रिक्षेतून खाली उतरवले. त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. तो वाहतूक पोलिसांना ढकलून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. बैलबाजार चौकात हा प्रकार रस्त्यावर सुरू होता. यावेळी इतर वाहने जागोजागी थांबली होती.

वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवकाने जबरदस्तीने मद्यपी रिक्षा चालकाला पकडून त्याला एका रिक्षेत कोंबले. त्या रिक्षेतून तो बाहेर पडण्यासाठी धडपडत होता. वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवक आणि इतर नागरिकांनी जबरदस्तीने मद्यपी रिक्षा चालकाला रिक्षेत बसवून बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेले. कल्याण, डोंबिवली शहरात संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवासी वाहतूक करणारे काही रिक्षा चालक मद्यपान करून प्रवासी वाहतूक करत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. या मद्यपी रिक्षा चालकाचे नाव समजू शकले नाही.