कल्याण : आपण शेअर बाजारात गुंतवणूक करा. आयपीओमध्ये गुंतवणूक करा. आपणास दामदुप्पट आर्थिक लाभ होईल असे आमिष कल्याणमधील गृहिणी असलेल्या एका महिलेला दाखवून ऑनलाईन दोन भामट्यांनी या महिलेची एक कोटी १७ लाख रूपयांची महिनाभराच्या कालावधीत फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ या महिनाभराच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. तक्रारदार महिला कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील सीएचएस स्वामी दर्शन गृहसंकुल भागात कुटुंबीयांसह राहते. या महिलेचे पती एका कार्पोरेट कंपनीत नोकरीला आहेत. तक्रारदार श्रीरूपा सिरसीकर या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नेहा अय्यर, प्राजक्त सामंत या भामट्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ऑगस्टमध्ये तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर नेहा अय्यर नावाच्या महिलेने संपर्क साधला. आपण एका गुंतवणूकविषयक काम करणाऱ्या संस्थेतून बोलते. आपण शेअर गुंतवणुकीत गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात का विचारणा करून आपणास कमी कालावधीत आम्ही अधिकचा आर्थिक लाभ मिळवून देऊ असे सांगून या महिलेने तक्रारदार महिलेला बोलण्याच्या जाळ्यात फसवून शेअर मधील गुंतवणुकीसाठी भाग पाडले.कमी कालावधीत अधिकची रक्कम मिळते म्हणून तक्रारदार महिलेने आपल्या विविध बँक खात्यामधून सुमारे १४ लाख ९९ हजार रूपये भामट्या सल्लागारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन माध्यमातून जमा केले. त्यानंतर विविध कारणांसाठी भामट्यांनी तक्रारदार महिलेकडून रक्कम भरणा करून घेतली. आयपीओमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले.
ही रक्कम भरणा केल्यानंंतर तक्रारदार महिलेला ऑनलाईन माध्यमातून आपली गुंतवणूक ५४ लाख ३१ हजार दिसू लागली. या रकमेतील काही रक्कम काढून घ्यावी म्हणून महिलेने प्रयत्न केले. त्यावेळी त्यांना आपणास आमच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे साठ लाख रूपये दोन दिवसात भरणा करावे लागतील तेव्हाच तुमची लाभाची रक्कम काढता येईल असे सांगण्यात आले. एवढी रक्कम भरणे शक्य नव्हते. ही रक्कम आपण भरणा केली नाहीतर आपली रक्कम गोठवली जाईल, असेही नेहा अय्यर, प्राजक्त सामंत तक्रारदार महिलेला सांगू लागले.
अखेर या महिलेने माहिती घेतल्यावर आपली आर्थिक फसवणूक या शेअर गुंतवणुकीतून झाले असल्याचे तिच्या निदर्शनास आले. या महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात जाऊन नेहा आणि प्राजक्त या भामट्या गुंतवणूक सल्लागारांच्या विरूध्द तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहर परिसरात ऑनलाईन माध्यमातून शेअर गुंतवणुकीत कोट्यवधी रूपयांची शंभरहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे.
