ठाणे : मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो. पण ठाण्यात आल्यानंतर वेग मंदावला. तसे माझा वेग मंदावणारा अजून जन्माला यायचा आहे. वाहतूक कोंडीमुळे हा वेग मंदावला होता. ठाणे म्हणजे एक शिवसैनिकांची पिढी होती. त्या काळात ठाणे हे ठाणेकरांना आनंद देणारे होते, मात्र आज ठाणे ठेकेदारांचे झाले आहे, अशी टिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवारी शिवसेना उपनेते दिवंगत अनंत तरे यांच्या जीवनावर आधारीत योगेश कोळी लिखित ‘अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे’ या पुस्तकाचे प्रकाशन उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. आनंद दिघे, मो. दा जोशी, अनंत तरे, प्रकाश परांजपे आणि रघुनाथ मोरे असे पक्षाचे दिग्गज नेते होऊन गेले. ते आज असते तर आज कोणी गद्दारीचा ‘ग’ उच्चार करण्याची हिंमत केली नसती, असे सांगत उद्धव यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या इतिहासाची आठवण करून दिली. आनंद दिघे, अनंत तरे आणि आमच्या कुटूंबियांचे देवस्थान एकच आहे, ते म्हणजे एकवीरा देवी. त्यामुळे आमचे नाते म्हणजे एकविरा आईची लेकरं, असे ते म्हणाले.
इथे काही झाले की शेती करायला जातात, तेही हेलिकॉप्टरने जातात. शेती करतो की रेडी कापतो, माहिती नाही, अशी टिकाही त्यांनी शिंदेंवर नाव न घेता केली. शिवसेनेवर संकट आलं की ती आणखी मजबूत होते. श्रीवर्धनच्या निवडणुकीत अनंत तरे माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते. एवढी संकटं आली, तरी तरे कुटुंबाने भगवा सोडला नाही. हीच खरी निष्ठा आहे, असे ते म्हणाले. ठाण्यात विकास झालाय, त्यावर पैसे खर्च झाले. शहरात वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी होत आहे. मग, विकास कुठे आहे आणि त्यावर झालेला खर्च गेला कुठे. ठाणे महापालिकेची तिजोरी लुटली गेली आहे. मुंबई, ठाणे आणि राज्याची तिजोरी लुटणाऱ्यांविरुद्ध आपण सोमवारी मोर्चा काढणार आहोत. या भ्रष्टाचाराविरोधात आता सर्वांनी एकत्र यायचं आहे, असे आवाहनही त्यांनी ठाणेकरांना केले.
अनंत तरेंचे ऐकले असते तर…
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला संपविण्याचा डाव आखला होता. या निवडणुकीत स्वतंत्र निवडणुक लढलो. या निवडणुकीत अनंत तरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तेव्हा अमित शाह यांच्या चरणी लोटांगण घालून ‘वाचवा वाचवा’ असा हंबरडा फोडणारे लोटांगणवीर माझ्याकडे आले आणि म्हणाले, तरेंना समजवा नाहीतर निवडणुकीत पराभव होईल. त्यावेळी मी तरे यांना समजावले की आधी भाजपला रोखूया आणि नंतर आपल्यातील मानपान बघूया. त्यावेळेस तरे म्हणाले होते की, हा माणूस एक दिवस दगा देईल आणि तेच झाले. कधी कधी निष्ठेचे मुखवटे लावून काहीजण आपल्या भोवती फिरत असतात, आपल्याला ते कळतही नाही. त्यावेळेस तरेंचे ऐकले असते तर, आज पश्चात्ताप झाला नसता, अशी कबुली उद्धव यांनी दिली.