ठाणे : ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पदाधिकारी मेळावे, बैठका आणि जाहीर सभांचे आयोजन सर्वच राजकीय पक्षांकडून आखले जात असून अशाचप्रकारे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १६ नोव्हेंबर रोजी तीन जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभा ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या शहरात होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात होणाऱ्या या सभांमध्ये उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघामध्ये २४४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यामध्ये शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजीत पवार गट), समाजवादी पक्ष, एमआयएम यासह इतर पक्षांबरोबरच अपक्ष ‌उमेदवारांचा समावेश आहे. काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रचाराची रणनिती आखण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून पदाधिकारी मेळावे, बैठका आणि जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. अशाचप्रकारे ठाणे जिल्ह्यात तीन ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे यांच्या १६ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात एकूण तीन सभा होणार आहे. यानुसार डोंबिवली, कल्याण ग्रामीण या दोन मतदारसंघांसाठी डोंबवलीत दुपारी एक वाजता पहिली सभा होणार आहे. कल्याण पूर्व, अंबरनाथ, कल्याण पश्चिम या तीन मतदारसंघांसाठी कल्याण पूर्वेत सायंकाळी ५ वाजता सभा होणार आहे. तर, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ऐरोली या चार मतदारसंघांसाठी ठाणे शहरात सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात होणाऱ्या या सभांमध्ये उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – ठाणे : रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार शांताराम मोरे विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार महादेव घाटाळ यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघामध्ये घाटाळ यांच्या प्रचारासाठी ६ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली नव्हती. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.