बदलापूरः बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने बुधवारी सकाळी इशारा पातळी ओलांडून धोका पातळी गाठली होती. मात्र दुपारच्या सुमारास नदीची पाणी पातळी खालावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नदीकिनारच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र त्यानंतरही दुपारी १२ च्या सुमारास उल्हास नदी इशारा पातळीवर होती. कल्याण ग्रामीण भागात कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर रायते येथील पुलही पाण्याखालीच होता.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळी सकाळच्या सुमारास १७.५० च्या जवळ होती. ही उल्हास नदीची धोका पातळी आहे. मात्र त्या पातळीवर पाणी गेले नसल्याने बदलापुरचा पुराचा धोका काही अंशी टळला होता. सकाळी ९ च्या सुमारास नदीच्या पाणी पातळीत घट नोंदवली गेली. सकाळी ९ वाजता उल्हास नदीची बदलापुरातील पाणी पातळी १७.२१ मीटर इतकी होती. तर त्यानंतर पाण्याची पातळी आणखी कमी झाली. दुपारी १२ वाजता उल्हास नदीच्या पाणी पातळी १७ मीटरवर पोहोचली होती. त्यामुळे बदलापुरचा पुराचा धोका टळण्याचे बोलले जाते. मात्र उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. उल्हास नदीची इशारा पातळी १६.५० मीटर इतकी आहे. त्यामुळे आणखी पाणी कमी होण्याची आशा आहे.
याच काळात बदलापूर शहराच्या पुढे आपटीजवळ बारवी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बारवी नदीच्या माध्यमातून उल्हास नदीला येऊन मिळत असतो. त्यामुळे बदलापुरात पाणी पातळी कमी होत असली तरी बारवी धरणातून या काळात सुमारे २३० घनमीटर प्रति सेकंद विसर्ग सुरू होता. त्यामुळे आपटीपुढे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. सकाळी नऊच्या सुमारास रायते येथील कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक बंद होती. येथे शेजारी सुरू असलेल्या नव्या पुलाच्या कामातील कामगार येथे पाण्यात अडकले होते. त्यांना पोकलेनच्या मदतीने काढण्यात येत होते. या मार्गावर म्हारळजवळ, वरप, कांबा आणि रायतेजवळ रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येथे अडकून पडल्या होत्या. त्यांच्या आणि सखल भागात पाणी साचल्याने विस्थापीत झालेल्या नागरिकांच्या बचावासाठी स्थानिक प्रशासनासोबतच स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी सक्रीय होते.
टिटवाळा बदलापूर मार्गावरही पाणी
रायते येथून जाणारा टिटवाळा बदलापूर मार्गावरही पाणी साचले होते. येथे सखल भागात रस्त्यावर एक मालवाहू गाडी पाण्यात अडकली होती. तर पुढे दहागावपुढे बारवी नदीवरील पुलावरही पाणी आले होते. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दुपारी एकच्या सुमारास पाऊस कमी झाल्याने रायते येथील उल्हास नदीची पाणी पातळीही खालावत होती. मात्र पुलावर पाणी कायम होते. त्यामुळे वाहतूक बंद होती. शेजाऱच्या उल्हासनगर शहरात वालधुनी नदी किनारच्या काही घरांमध्ये पाणी शिरले होते. येथील काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासने दिली.