बदलापूरः गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संत दर पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते आहे सकाळपासून उल्हास नदी दुथडी भरून वाहत होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीवरील कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरचा रायते पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तर बदलापुरातही उल्हास नदीने १६ मिटर ही पाणी पातळी गाठली होती. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार दोन दिवसांपासून ठाणे, रायगड आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ठाणे जिल्ह्यात कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांमध्ये वाहणारी उल्हास नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसात सातत्याने वाढ नोंदवली गेली. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बदलापुरातील उल्हास नदीची पाणी पातळी १६ मीटरवर पोहोचली होती. उल्हास नदीची इशारा पातळी १६.५० मीटर इतकी आहे. तर नदीची धोका पातळी १७.५० मीटर इतकी आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बदलापुरातील चौपाटी परिसरात पाणी साचले होते. सतर्कतेचा इशारा म्हणून कुळगाव बदलापूर नगरपालिका, अग्निशमन दल आणि पोलिस प्रशासन सतर्क होते.

संततधार पावसामुळे बारवी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली. रविवारी धरण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. सायंकाळी सहा वाजता धरणातून ३३० घन मीटर प्रति सेकंद पाणी विसर्ग सुरू होता. बारवी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कल्याण तालुक्यात उल्हास नदीची पाणी पातळी आणखी वाढत होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातत्याने वाढणाऱ्या पाणी पातळीमुळे रायता येथील कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलाला पाणी लागले. त्यामुळे पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्याचा स्थानिक वाहतुकीवर परिणाम झाला.

बदलापूरकरांचे टेन्शन वाढले

उल्हास नदीला यंदाच्या वर्षात तीन वेळा पूरस्थिती निर्माण झाली. यंदा पहिल्यांदाच ऐन मे महिन्यात उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात आणि आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा उल्हास नदी इशारा पातळी जवळ पोहोचली होती. त्यामुळे नागरिकांचे टेन्शन वाढले होते.