उल्हासनगर : पाच मजली इमारतीचे स्लॅब तळमजल्यावर कोसळले; भीषण दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू!

कल्याणजवळच्या उल्हासनगरमध्ये एका पाच मजली इमारतीचे वरच्या पाच मजल्यांचे स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळल्याची दुर्घटना घडली असून यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

ulhasnagar building collapse
इमारतीचे ५ मजले तळमजल्यावर कोसळले!

उल्हासनगरमध्ये एका पाच मजली इमारतीचे पाचही मजल्यांचे स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळल्यामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ९च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. उल्हासनगर -२ च्या नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदासमोरच्या साई सिद्धी या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ मदतीसाठी ठाणे महानगर पालिकेची TDRF टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. या ठिकाणी शोधकार्य सुरू असून आत्तापर्यंत या पथकांनी ढिगारा काही प्रमाणात बाजूला काढून ५ मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ulhasnagar building collapse new

तळमजला अधिक पाच मजल्यांची ही इमारत असून नेमकी दुर्घटना घडण्यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

 

“स्लॅब पडल्यानंतर इथे पालिकेच्या माध्यमातून मदतकार्य सुरू आहे. सध्या किती लोकं जखमी असतील, याचा अंदाज नाही. पण ५ लोकं यामध्ये दगावले आहेत. त्या वेळी उलवाची रेती वापरली. त्यावेळी कटरने डिमॉलिशन झालं. पण नंतर बिल्डरने तशीच वेल्डिंग करून स्लॅब भरले. ते स्लॅब आता केक कापल्यासारखे खाली पडत आहेत. यासंदर्भात पालकमंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली आहे”, अशी माहिती शिवसेनेचे उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

दोनच आठवड्यांपूर्वी अशीच दुर्घटना!

१५ दिवसांपूर्वीच म्हणजे १५ मे रोजी उल्हासनगरमध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. उल्हासनगर शहरातील कॅम्प एक भागात असलेल्या मोहिनी पॅलेस या चार मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब १५ मे रोजी दुपारच्या सुमारास कोसळल्याने मोठा अपघात झाला. टेरेसचा स्लॅब थेट तळ मजल्यापर्यंत आल्याने इमारतीमधील ३० ते ३२ नागरिक यात अडकले. या इमारतीत ९ सदनिका आणि तळमजल्यावर ८ दुकाने होती. पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. काही रहिवाशांनी स्लॅब कोसळताच घराबाहेर धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोघांना खिडकीचे गज कापून बाहेर काढावे लागले. तर १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही इमारत १९९४ साली उभारण्यात आली होती. १९९० च्या काळात उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणावर उलवा रेतीचा वापर करून इमारती उभ्या केल्या गेल्या. यातील बहुतांश बांधकामे बेकायदा होती. याच यादीतील इमारती कोसळण्याचे सत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ulhasnagar building slab collapse incident 5 dead tdrf on spot for search operation pmw

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या