Manoj Jarange Patil Azad Maidan : उल्हासनगरः मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला राज्यभरातून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादात आता उल्हासनगर शहरानेही आपला ठाम पाठिंबा नोंदवला आहे. शहरातील सकल मराठा समाजाकडून आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास ६०० बांधवांसाठी भोजन, उपहार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या राज्याचे लक्ष वेधून घेत असलेले जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मुंबईच्या आझाद मैदानात सुरू आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून पाठिंबा मिळतो आहे. आंदोलकांच्या दोन वेळच्या जेवणासाठी राज्यभरातून अन्न, भाकरी, इतर तयार खाद्यपदार्थ पाठवले जात आहेत. त्यात मुंबई आणि उपनगरातील शहरांतूनही पुरवठा केला जातो आहे. बदलापूर, अंबरनाथ यासारख्या शहरांतून मदत केल्यानंतर उल्हासनगर शहरातील मराठा बांधवांनीही मुंबईतील आंदोलकांसाठी जेवण, खाद्यपदार्थ आणि पाणी पुरवठा केला आहे.
केवळ आरक्षणासाठी नाही, तर सामाजिक न्याय आणि तरुणाईच्या भवितव्याचा लढा मानला जात आहे. या लढ्यात उल्हासनगरकरांनीही आपली जबाबदारी ओळखत शाकाहारी बिर्याणी, वेफर्स आणि पाण्याच्या बाटल्या उपोषणस्थळी पोहोचवल्या, अशी माहिती सकल मराठा समाजातर्फे सांगण्यात आले आहे. या उपक्रमामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांना उर्जा आणि प्रेरणा मिळाली. या सेवाभावी उपक्रमावेळी प्रा. व्ही. व्ही. पाटील, ज्ञानेश्वर करवंदे, अण्णासाहेब खतोडे, सुदेश पाटील, सुधीर कान्हेरे, सुनिता गव्हाणे, राजू माने, भरत मोटकर, रवींद्र मिंडे, अरुण पाटील यांच्यासह मराठा समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पाठिंब्याने राज्यभरातून आलेल्या आंदोलकांना बळ मिळते आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन हक्क, सामाजिक न्याय आणि भावी पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न म्हणून उभे राहत आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या सकल मराठा समाजाकडून मिळालेला खंबीर पाठिंबा ही केवळ मदत नसून, आंदोलनाच्या ताकदीत भर घालणारी ठरली आहे, अशी भावना व्यक्त होते आहे.