ठाणे : शहरातील उपवन आणि मानपाडा येथे गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर फटाक्यांची आतषबाजी सुरू असून स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे दोन्ही परिसर “मौन क्षेत्र” म्हणून घोषीत आहेत. या ठिकाणी फटाके वाजवणे कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील याठिकाणी फटाके वाजवले जात असून या फटाक्यांच्या आवाजामुळे परिसरातील शांतता भंग होत आहे. याचा परिणाम वन्यप्राण्यांवर होत आहे. त्यामुळे यावर पर्यावरण प्रेमी तसेच नागरिकांनी ठाणे पोलिस आणि महापालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दिवाळीच्या कालावाधीत दरवर्षीच उपवन तलावाजवळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेलगत तसेच मानपाडा येथील नीलकंठ ग्रीन कॉम्प्लेक्स परिसरात बेकायदेशीर फटाक्यांची आतषबाजी सुरु असते. यंदाच्या वर्षीही दिवाळीच्या काही दिवस अगोदरपासूनच फटाक्यांची आतषबाजी सुरु आहे. या आतषबाजीमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे दोन्ही परिसर मौन क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आली आहे. परंतू, तरी देखील नागरिकांकडून याठिकाणी बेकायदेशीररित्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. याकडे पोलीस प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असते.
यंदा याभागातील जागृक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी यांनी एकत्रित येत याठिकाणी उपयायोजना कराव्यात अशी मागणी पोलीस प्रशासन तसेच महापालिकेकडे केली आहे. येऊर एन्व्हरमेंटल सोसायटी, अर्थकिड्स ह्युमॅनिटी फाऊंडेशन, होप फ्रेंडस ऑफ नेचर तसेच आणखी काही पर्यावरण प्रेमी संस्थांच्या वतीने ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. या पत्रात मैन क्षेत्रात कशाप्रकारे उपाययोजना करता येतील याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या उपाययोजना आखाव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
अशा आहेत मागण्या
१) १९ ते २४ ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ६ ते ११ या वेळेत परिसरात बीट मार्शल तैनात करून नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी.
२) मौन क्षेत्रात फटाके वाजवणाऱ्यांवर कायद्याने बंदी व कारवाई करण्यात यावी.
३) पोलीस आणि ठाणे महापालिकेने परिसरात फटाके बंदीबाबत जनजागृतीसाठी फलक व बॅनर लावावेत.