गर्दी वाढली पण केंद्रांवरील सुविधेबाबत नागरिकांचे समाधान
ठाणे : गुरुवारपासून सुरू झालेल्या करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींची लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढून गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र ठाणे जिल्ह्य़ात वेगळेच चित्र दिसून आले. जिल्ह्य़ातील लसीकरण केंद्रांवर नेहमीपेक्षा थोडीफार गर्दी वाढली असली तरी येथे कोणत्याही गडबड-गोंधळाविना लसीकरण सुरू असल्याचे दिसून आले. तसेच लसीकरणासाठी जास्त वेळ ताटकळत उभे राहावे लागत नसल्याचे सांगत काही नागरिकांनी लसीकरण केंद्रातील सुविधेबाबत समाधान व्यक्त केले.
करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा गुरुवारपासून सुरू झाला. या टप्प्यात ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. या व्यक्तींची लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढून गोंधळ उडण्याची शक्यता होती. या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्हा तसेच पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्रांचा आढावा घेऊन त्यामध्ये लसीकरणाच्या उपलब्ध साठय़ानुसार लसीकरण केंद्र निश्चित केले होते. त्यामध्ये जिल्ह्य़ात एकूण ११२ लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे कल्याण वगळता अन्य कोणत्याच ठिकाणी लसीकरण केंद्रे वाढविण्यात आली नव्हती. यामुळे जिल्ह्य़ातील केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊन गोंधळ उडण्याची भीती व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच झाले नाही. ठाणे शहरातील पालिकेच्या ३२, तर खासगी १२ केंद्रांवर गुरुवारी लसीकरण करण्यात येत होते. या केंद्रांच्या परिसरात नागरिकांना बसण्यासाठी मंडप आणि खुच्र्याची व्यवस्था यापूर्वीच पालिका आणि लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांवर नेहमीपेक्षा जास्त नागरिक लसीकरणासाठी आले होते. परंतु येथे कोणत्याही गोंधळाविनाच लसीकरण सुरू असल्याचे दिसून आले. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत सध्या पालिका आणि खासगी रुग्णालयांच्या १५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. याच ठिकाणी गुरुवारपासून ४५ वर्षांवरील लाभार्थीना लस देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या केंद्रावर लस घेण्यासाठी गुरुवारी गर्दी वाढली होती. लसीकरण केंद्रांवर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पालिकेची सहा तर खासगी चार नवीन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असून यामुळे एकूण २५ केंद्रांवर एकाच वेळी लसीकरण होणार आहे. सोमवारपासून वाढीव केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले.
भिवंडी महापालिका क्षेत्रात धोबीतलाव, भाग्यनगर कामतघर आणि उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. या ठिकाणी गुरुवारी लसीकरणासाठी फारशी गर्दी नव्हती. अंबरनाथ आणि बदलापुरात लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली नाही. कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात तीन ठिकाणी शासकीय तर एका ठिकाणी खासगी पद्धतीने लसीकरण केले जाते आहे. या सर्वच ठिकाणी नेहमीप्रमाणे नागरिक लसीकरणासाठी येत होते. पहिल्या दिवशी खूप गर्दी वाढल्याचे दिसून आले नाही. तसेच अंबरनाथमध्येही आयुध निर्माणीच्या केंद्रावर नेहमीसारखीच गर्दी असल्याचे दिसून आले. उल्हासनगर शहरात सहा ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू असून यामुळे गर्दी विभागली गेली होती.
ग्रामीण भागांतही सुरळीत लसीकरण
ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही असेच काहीसे चित्र होते. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रामध्ये नेहमीपेक्षा जास्त नागरिक गुरुवारी आले होते. मात्र, रुग्णालय प्रशासनाने चार ते पाच ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने वेगाने लसीकरण होत होते. त्यामुळे येथे नागरिकांच्या रांगा दिसून आल्या नाहीत.
