सणासुदीला भाज्या महाग

श्रावण महिन्यात आणि गणेशोत्सवाच्या काळात मागणी असलेल्या फ्लॉवर, गवार, वाटाणा, वांगी तसेच इतर काही भाज्या महागल्या आहेत.

किरकोळ बाजारात २० ते ३० रुपयांनी वाढ

ठाणे : श्रावण महिन्यात आणि गणेशोत्सवाच्या काळात मागणी असलेल्या फ्लॉवर, गवार, वाटाणा, वांगी तसेच इतर काही भाज्या महागल्या आहेत. घाऊक बाजारात दोन रुपये ते तीस रुपये प्रति किलोने तर, किरकोळ बाजारात तीन रुपये ते वीस रुपये प्रति किलोने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाज्यांची आवक घटलेली नसून ती नेहमीप्रमाणेच सुरू आहे. पंरतु श्रावण महिन्यात भाज्यांची मागणी वाढली असून त्या तुलनेत आवक वाढलेली नाही. त्यामुळेच भाज्यांच्या दरात वाढल्याची माहीती वाशी कृषी उत्पन्न बाजारसमितीकडून देण्यात आली.

श्रावण महिना तसेच गणेशोत्सवाच्या काळात अनेक जण मांसाहाराचे सेवन करण्याचे टाळतात. या कालावधीत भाज्यांना मोठी मागणी असते. त्या प्रमाणात काही वेळेस भाज्यांचा पुरवठा होत नाही. विविध कारणांमुळे भाज्यांची आवक काही प्रमाणात कमी होते. यामुळे भाज्यांच्या दरात वाढ होते. यंदाही फ्लॉवर, गवार, वाटाणा, वांगी, घेवडा, कारले या भाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे आणि नाशिक जिल्ह्य़ांतून भाज्यांच्या पुरवठा होतो. या बाजार समितीमध्ये सध्या दिवसाला ६०० ते ६५० भाज्यांच्या गाडय़ा दाखल होत आहेत. घाऊक बाजारात दहा दिवसांपूर्वी १८ रुपये प्रति किलोने विकला जाणारा फ्लॉवर सध्या २० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. ३५ रुपये प्रति किलोने विकली जाणारी गवार ४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. ३२ रुपये प्रति किलोने विकला जाणारा घेवडा ३६ रुपये किलोने, तर १६ रुपये प्रति किलोने विकले जाणारे कारले २० रुपये प्रति किलोने विकले जात आहे. ६० रुपये प्रति किलोने विकला जाणारा हिरवा वाटाणा सद्यस्थितीला ९० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. तसेच १६ रुपये प्रति किलोने विकली जाणारी वांगी सध्या २० रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या महागाईमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. भाज्यांची आवक नेहमीप्रमाणेच सुरू असते. परंतु श्रावण महिन्यात भाज्यांची मागणी वाढते. त्या तुलनेत आवक वाढत नाही. त्यामुळेच भाज्यांच्या दरांत वाढ होत आहे, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकाऱ्याने दिली.

सणासुदीच्या काळात इतर खर्च वाढत असतो. त्यात भाज्या आणि सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वच आर्थिक गणित कोलमडले आहे.

– कल्पना उतेकर, गृहिणी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vegetables are expensive for festivals ssh