डोंबिवली- वीजचोरी शोध मोहिमेवरील महावितरणच्या भरारी पथकावर डोंबिवली जवळच्या खोणी गावात बुधवारी दुपारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पथकातील एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. पाच कर्मचाऱ्यांना हल्लेखोरींनी धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. परत गावात आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

मानपाडा पोलिस ठाण्यात महावितरण कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाला बेकायदा टपऱ्यांचा विळखा

रजिंत ठोंबरे, मारुती ठोंबरे, हरेष ठोंबरे, बायमाबाई ठोंबरे, अंकीता ठोंबरे, राजीन ठोंबरे, सचिन ठाकरे, भगवान ठोंबरे, सचिन ठाकरेचा भाऊ (नाव माहित नाही) आणि इतर सहा ते सात अनोखळी व्यक्ती अशी हल्लेखोरांची नावे आहेत.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची तीन पथके कल्याण पश्चिम उपविभाग एक अंतर्गत खोणीगाव परिसरात वीजचोरीच्या विशेष शोध मोहिमेवर होती. उपकार्यकारी अभियंता राजेश म्हसणे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने खोणीगाव येथील श्रीधर ठोंबरे, रंजित ठोंबरे व बायमाबाई ठोंबरे यांच्या दुमजली बंगल्यातील वीज पुरवठ्याची तपासणी केली. यावेळी दोन मीटरमधून थेट वीजचोरी सुरू असल्याचे तर एका मीटरमध्ये फेरफार करून मीटरचा वेग कमी केल्याचे आढळले.

हेही वाचा >>> डोंबिवली: महावितरणचे देयक ऑनलाईन प्रणालीतून भरुनही देयक न मिळाल्याचा महावितरणचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबधित वीज मिटर जप्त करून पथक निघाले असता रंजित ठोंबरे याने जमाव जमवून पथकाला अडवून त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस एस. एम. वाघमारे यांना जमावाने बेदम मारहाण केली. इतर दोन पोलिस एक वाहनचालक, महावितरणचे चार कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिविगाळ केली. दगडफेक करून वाहनाचे नुकसान करत जप्त केलेले मीटरही हिसकावून नेले. सरकारी कामात अडथळा, गैरकायद्याची मंडळी जमवून मालमत्तेचे नुकसान अशा अनेक कलमान्वये पोलिसांनी ग्रामस्थांवर गु्न्हे दाखल केले आहेत. खोणी गावातील बहुतांशी घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा, विजेचा वापर करणाऱ्या सुविधा अधिक संख्येने आहेत. त्या प्रमाणात या गावातून वीज देयक वसुली होत नसल्याने ही तपासणी मोहीम अधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे.