शहरी भागात सर्वत्र काँक्रीटचे जंगल असले तरी अजूनही काही ठिकाणी हिरवाई टिकून आहे.

सकाळची नीरव शांतता आणि सोबत पक्ष्यांचा किलबिलाट अशा हेवा वाटावा अशा निसर्गाच्या सान्निध्यात पक्ष्यांची दुनिया अनुभवण्याची संधी पर्यावरण दक्षता मंच या संस्थेनेयेत्या रविवारी उपलब्ध करून दिली आहे.

संस्थेच्या निसर्गभ्रमंती या उपक्रमांतर्गत एकदिवसीय निसर्गभ्रमंतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत रविवारी ठाणे पूर्व विभागातील बारा बंगला परिसर आणि डोंबिवलीजवळील पडले गावात निसर्गभ्रमंती होईल. त्यात सहभागी होण्यासाठी पर्यावरण शाळा येथे सकाळी १० ते ६ या वेळेत ९८६९०३३५८३ किंवा ९०२८५९२५५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

  • कधी- रविवार, २२ मे,
  • कुठे- ठाणे आणि डोंबिवली.
  • केव्हा : सकाळी ७ वाजता.

पुन्हा एकदा ‘जंतर मंतर पोरं बिलंदर’

काही वर्षांपूर्वी बाल रंगभूमीवर प्रा. प्रवीण दवणे लिखित ‘जंतर मंतर पोरं बिलंदर’ हे नाटक बरेच लोकप्रिय झाले होते. खिडकीतून आकाश दिसत असले तरी खिडकी म्हणजे आकाश नसते, हा संदेश हसतखेळत देणाऱ्या या नाटकाला नाटय़दर्पण रजनीचा पुरस्कारही मिळाला होता. मात्र मध्यंतरीच्या काळात जीवनशैलीत बरेच बदल झाले. त्यामुळे नव्या पिढीचे बदलते भावविश्व विचारात घेऊन प्रा. दवणे यांनी या नाटकाचे पुनर्लेखन केले असून त्याचा प्रयोग येत्या शनिवारी २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन येथे होणार आहे. प्रा. मंदार टिल्लू यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. पाठय़पुस्तकांपलीकडेही जग असते, याचे भान आणून देणाऱ्या या नाटकात वेदांत आपटे, शौनक करंबळेकर, आदिती बेहरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय अन्य २० कलावंतही नाटकात आहेत.

  • कधी : शनिवार, २१ मे,
  • कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे.
  • केव्हा : सकाळी ११ वाजता.

दागिन्यांचे प्रदर्शन

महिलांना दागिन्यांचे कायमच आकर्षण असते. त्यांची ही हौस पुरविण्यासाठी ठाण्यातील ठाकूरवाडी नेहमीच सज्ज असते. सोने, चांदी, मोती अशा पारंपरिक धातूंबरोबरच प्लॅटिनम, अमेरिकन डायमंड्स, ऑनिक्स आदी प्रकारांचे दागिने येथे मिळतात. सोन्या-चांदीच्या किमती कितीही चढय़ा असल्या तरी दागदागिन्यांची हौस अजिबात कमी होत नाही. पारंपरिक भारतीय दागिन्यांमध्ये जयपूर पद्धतीच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. कुंदन मीनाकाम हे जयपुरी संस्कृतीच्या दागिन्यांचे वैशिष्टय़. सध्या लाल-हिरव्या-निळ्या कुंदनांनी सजलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन ठाण्यातील गोखले रोडवरील ठाकूरवाडी येथे भरविण्यात आले आहे.

  • कुठे : ठाकूरवाडी, पानेरी साडीच्या समोर, ठाणे.
  • कधी: दररोज दुपारी १२ ते रात्री ९.

होय! मी सावरकर बोलतोय..!

प्रखर राष्ट्राभिमानी, क्रांतिकारक, पुरोगामी वृत्तीचे समाजसेवक, प्रतिभावान साहित्यिक, कवी असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समग्र जीवनाचा आढावा घेणाऱ्या ‘होय! मी सावरकर बोलतोय!’ या अनंत ओगले लिखित नाटकाचा प्रयोग शनिवारी कल्याणमध्ये होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५०व्या आत्मार्पण वर्षांचे औचित्य साधून कल्याणमधील सावरकरप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन अत्रे रंगमंदिरात या प्रयोगाचे आयोजन केले आहे. नाटकातील नेपथ्य, पाश्र्वसंगीत, दिग्दर्शन आणि भूमिका या सर्वच जबाबदाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पार पाडल्या आहेत.

  • कधी : शनिवार, २१ मे,
  • कुठे : आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण</li>
  • केव्हा : सकाळी ११ वाजता.

अंबरनाथमध्ये विज्ञान रंजन मेळावा

भरपूर खेळ आणि मनोरंजनाच्या रतीबानंतरही उरलेल्या सुट्टीचे काय करायचे अशा विवंचनेत असलेल्या मुलांसाठी मराठी विज्ञान परिषदेच्या अंबरनाथ शाखेने येत्या शनिवार-रविवारी रंजन रीतीने प्रात्यक्षिकांसह वैज्ञानिक संज्ञा समजावून देणारा विशेष मेळावा आयोजित केला आहे. शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ आणि रविवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत विविध विषयांवर तज्ज्ञांचे प्रात्यक्षिकांसह व्याख्याने होणार आहेत. शनिवारी २१ मे रोजी सकाळी उद्घाटनानंतर साडेनऊ वाजता प्रदीप नायक यांचे खगोलशास्त्र या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर ११.३० वाजता ऋतुराज जोशी जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन या विषयावर दृकश्राव्य माध्यमाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी सकाळी नऊ वाजता प्रा. भगवान चक्रदेव विविध प्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक संज्ञांची ओळख करून देणार आहेत.

त्यानंतर ११.३० वाजता पुण्यातील माधव खरे प्रात्यक्षिकांसह विमान उड्डाणाचे तंत्र विद्यार्थ्यांना समजावून सांगणार आहेत. दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या वेळेत मुले स्वत: विविध प्रयोग सादर करणार आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मेळाव्यात भाग घेता येईल.

  • कधी / केव्हा: शनिवार २१ मे, सकाळी ९ ते दुपारी २. रविवार २२ मे, सकाळी ९ ते संध्याकाळी ५.
  • कुठे :डॉ. हेडगेवार सभागृह, भाऊसाहेब परांजपे विद्यालय, कानसई, अंबरनाथ (पूर्व).

प्रभातकाळी संगीतानंद

सकाळीच्या प्रहरी शास्त्रीय सुरावटी कानावर पडल्या तर रसिकांच्या लेखी तो अलभ्य लाभ असतो. येत्या रविवारी ठाण्यात तसा योग आहे. दत्ताभय्या स्मृतीनिमित्त सहयोग मंदिर सभागृहात सकाळी ९.३० वाजता पहिल्या सत्रात अनंत जोशी यांचे सोलो हार्मोनिअम वादन तर दुसऱ्या सत्रात ओंकार दादरकर यांचे गायन आयोजित करण्यात आले आहे. उत्पल दत्ता त्यांना तबलासाथ करणार आहेत. प्रवेश विनामूल्य आहे.

  • कधी : रविवार, २२ मे,
  • केव्हा : सकाळी ९.३० वाजता.
  • कुठे:  सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, ठाणे (प).

चित्रांचे ‘जलाढय़’ प्रदर्शन

कोकण किनारपट्टीच्या भौगोलिक परिस्थितीचा सुयोग्य वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापन केली. स्वराज्यावर समुद्रातून होणारे हल्ले  रोखण्यासाठी कोळी बांधवांच्या मदतीने महाराजांनी मराठी आरमाराची संरक्षण फळी समुद्रात उभी केली. कल्याण बंदरामध्ये नौकाबांधणीच्या कार्याला सुरुवात झाल्यापासून ते मराठय़ांचे शेवटचे आरमारप्रमुख तुळाजी आंग्रे यांचा झालेल्या पराभवापर्यंतचा काळ चित्रकार सचिन सावंत यांनी कुंचल्याच्या साहाय्याने चित्रित केला आहे. मराठा आरमाराचे सामथ्र्य, त्यांच्या मोहिमा, युद्धाचे प्रसंग आणि शेवटचा पराभव या सगळ्यांचे दर्शन या चित्रांमधून साकारण्यात आले आहे. त्यांच्या या चित्रांचे ‘जलाढय़’ हे प्रदर्शन शनिवार २१ ते २३ मे दरम्यान ठाणे कलाभवन येथे आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, २१ मे रोजी भारतीय नौसेनेचे व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे, तर २१ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता सरखेल रघुजीराजे आंग्रे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. ‘आंग्रेंचा कोकण आंग्रेच्या नजरेतून.. व्हय म्हाराजा’ असे या सत्राचे नाव असणार आहे.

  • कधी- २१ ते २३ मे,
  • केव्हा : सकाळी ११ वाजता.
  • कुठे : ठाणे कलाभवन, बिगबाजार जवळ, ठाणे.

नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांची कार्यशाळा

महिला आपल्या सौंदर्याबाबत नेहमीच सजग असतात. सध्या विविध प्रकारचे कॉस्मेटिक्स बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्याच्या दुष्परिणामांमुळे नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने वापरण्याकडे महिलांचा कल वाढत आहे. म्हणूनच ठाण्यातील कोरम मॉलतर्फे महिलांसाठी खास नैसर्गिक साधनांचा वापर करून प्रसाधने तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यात चॉकलेट मास्क, क्लिजिंग ओट मिल्क आणि मास्क, दही आणि मधाचा वापर करून अ‍ॅण्टी अक्ने मास्क, कोरफडपासून तयार केलेले अ‍ॅलो जेल, पपईपासून तयार केलेले स्क्रब, डोळ्यांसाठी गुलाबापासून तयार केलेले क्रीम यांसारख्या अनेक प्रसाधनांचे प्रशिक्षण या कार्यशाळेमध्ये दिले जाणार आहे.

  •  कधी : बुधवार, २५ मे,
  • कुठे : कोरम मॉल, पूर्वद्रुतगती मार्गाजवळ, ठाणे.
  • केव्हा : दुपारी ३ ते रात्री ८.

सफर श्रीस्थानकाची

महाराष्ट्रातील एक मोठे महानगर अशी ख्याती असलेल्या ठाण्याला हजारो वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. शिलाहारांच्या राजवटीत राजधानीचा दर्जा असलेले ठाणे श्रीस्थानक म्हणून ओळखले जात होते. ठाण्यात अजूनही प्राचीन मूर्ती, ताम्रपट, शिलालेख, वीरगळ, जुन्या वास्तू, प्राचीन मंदिरांचे अवशेष आहेत. ब्रह्मदेवाची वैशिष्टय़पूर्ण मूर्तीही ठाण्यात आहे. सध्या आधुनिकीकरणात लोप पावत चाललेल्या ऐतिहासिक ठाण्याची नव्या पिढीला ओळख व्हावी या हेतूने जिज्ञासा संस्थेने येत्या शनिवार-रविवारी सकाळी प्रत्येकी पाच तासांच्या सहली आयोजित केल्या आहेत. सुप्रसिद्ध लेखक सदाशिव टेटविलकर मुलांना या स्थळांचा परिचय करून देणार आहेत. या सहलीदरम्यान मुलांना टेटविलकर यांचे इतिहासविषयक पुस्तक भेट म्हणून दिले जाईल. शनिवार, रविवारी सकाळी सहा वाजता भास्कर कॉलनी येथील सव्‍‌र्हिस रोडजवळील तुळजाभवानी मंदिरापासून सहलीस प्रारंभ होईल. संपर्क- जिज्ञासा ट्रस्ट- २५४०३८५७.

तरुण स्वरांची ‘आरोही’!

‘सारेगमप’मधून ‘लिटील चॅम्प’ म्हणून प्रसिद्ध झालेले ‘बालगायक व बालगायिका’ आता तरुण झाले आहेत. संगीताचे पुढील शिक्षण घेऊन अधिक परिपक्व झाले असून त्यांना ऐकण्याची संधी ‘पंचम निषाद’ आणि ‘रंगस्वर’ यांनी रसिक श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आहे. ‘आरोही’ या दोन दिवसांच्या संगीत महोत्सवात मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे यांच्यासह स्वरांगी मराठे, सुरंजन खंडाळकर हे गायक तसेच चिंतामणी वारणकर (तबलावादक), ध्रुव बेदी (सतारवादक) हे तरुण कलाकारही सहभागी होणार आहेत. तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या आरोही संगीत महोत्सवाचे यंदा पंधरावे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व महाराष्ट्र वॉच कंपनी, दादर (पश्चिम) येथे सकाळी ११ ते ६ या वेळेत उपलब्ध.

  • कधी- शुक्र. २० आणि शनि. २१ मे १६
  • कुठे- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे रंगस्वर सभागृह, नरिमन पॉइंट, मंत्रालयासमोर
  • केव्हा- दोन्ही दिवशी सायंकाळी ६.३० वाजता.

अभिवाचनाचा आगळा उपक्रम ‘चला वाचू या’!

लोकांमध्ये उत्तम साहित्याची आवड निर्माण व्हावी, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, वाचन संस्कृतीच्या जतन व संवर्धनाबरोबरच ‘अभिवाचन’ या कलेबाबतची जाण वाढावी या उद्देशाने ‘व्हिजन’ आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला वाचू या’ हा अभिवाचनाचा एक आगळा व स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचन चळवळ उभी राहावी आणि अभिवाचनाचे एक कायमस्वरूपी व्यासपीठ तयार व्हावे हाही या उपक्रमागचा महत्त्वाचा उद्देश आहे.

उपक्रमाला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे. आत्तापर्यंत या उपक्रमात अभिनेते व कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र, संगीतकार कौशल इनामदार, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, वृत्तनिवेदक व ज्येष्ठ साहित्यिक अनंत भावे, तसेच राजन ताम्हाणे, शर्वाणी पिल्ले, विजय कदम आणि अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. ‘चला वाचू या’च्या नवव्या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर, अभिनेते शैलेश दातार, औरंगाबाद येथील रंगकर्मी पद्मनाभ फाटक व अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाकरिता रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. ‘व्हिजन’चे संचालक श्रीनिवास नार्वेकर आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

  • कधी- रविवार, २२ मे २०१६
  • कुठे- पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
  • केव्हा- सायंकाळी ५ वाजता

परेश रावल म्हणतात ‘मै और तुम’!

हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते परेश रावल यांनी बॉलीवूडमध्ये विनोदी, खलनायक किंवा चरित्र अभिनेता म्हणून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. परेश रावल आता बॉलीवूड सेलिब्रेटी झाले असले तरी ते मुळचे ‘नाटक’वाले आहेत. हिंदी रंगभूमीवरून त्यांचा अभिनय प्रवास सुरू झाला. ते आता बॉलीवूडमध्ये व्यग्र असले तरी नाटकावरील त्यांचे प्रेम कमी झालेले नाही. ते नाटकासाठी आवर्जून वेळ देतात. ‘कृष्णा वर्सेस कन्हय्या’ या नाटकाच्या यशानंतर परेश रावल आता एका नव्या नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे येत आहे. ‘मै और तुम’ असे त्यांच्या नवीन हिंदी नाटकाचे नाव असून याची निर्मिती त्यांच्या पत्नी स्वरूप संपत यांनी केली आहे. विशेष म्हणजे या नाटकात परेश रावल यांची दुहेरी भूमिका आहे.

  • कधी- रविवार, २२ मे २०१६
  • कुठे- टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए), नरिमन पॉइंट,
  • केव्हा- सायंकाळी ७.०० वाजता