ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वन परिक्षेत्रात अनधिकृत ढाबे, रेस्टाॅरंटच्या कचऱ्याचा धोका प्राणी-पक्ष्यांना होण्याची शक्यता आहे. या जंगलातील ढाबे, हाॅटेलमधून निघणारा खाद्य पदार्थांचा कचरा, मद्याच्या बाटल्यांचा खच संरक्षित वन क्षेत्राच्या सीमेवर, येऊरच्या जंगलात पसरलेला आहे. खाद्य पदार्थांचा कचरा खाण्यासाठी उकिरड्यावर माकड, गाई-गुरे, भटके श्वान आणि पक्षी येत असतात. त्यामुळे हे पदार्थ प्राणी-पक्ष्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई आणि ठाण्याचे फुफ्फुस आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरचे जंगल पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असतानाही जंगलाच्या भागात काही व्यवसायिकांनी आदिवासी पाड्यांजवळ बेकायदा बांधकामे करुन येथील आदिवासींना हद्दपार करण्यास सुरुवात केली. रात्री-अपरात्री येऊरच्या जंगलात पार्ट्या सुरु असतात. मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आणि वन विभागाला खडेबोल सुनावल्यानंतर येथील पार्ट्यांवर काहीसा आळा बसला. परंतु छुप्या पद्धतीने हे गैरप्रकार सुरुच असतात.

ठाणे, मुंबई भागातून अनेकजण विविध कार्यक्रम, समारंभ आणि ढाब्यावर जेवण्यासाठी आणि मद्य प्राशन करण्यासाठी जातात. परंतु या ढाबे, हाॅटेल आणि रेस्टाॅरंटमधून निघणारा कचरा किंवा काही हुल्लडबाजांकडून भर जंगलामध्ये झाडाखाली केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमुळे येथील वन्य जीवांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. जंगलामध्ये मोठ्याप्रमाणात प्लास्टिकचा कचरा, आदल्या दिवशी उरलेले अन्न पदार्थ, मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. उकिरड्यावर याचे प्रमाण अधिक दिसते. हा कचरा जंगल, परिसरातील माकडे, पक्षी, भटके श्वान आणि गाई-वासरे खाऊ लागले. या पदार्थांमुळे त्यांच्या पचनसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून हे घातक ठरु लागले आहे.

कचऱ्यामुळे प्राणी-पक्ष्यांमध्ये संसर्गजन्य आजार पसरण्याचीही शक्यता आहे. प्लास्टिकचा कचरा गुरे किंवा प्राणी,पक्ष्यांच्या पोटात गेल्याने ते घातक ठरू शकते. उकिरड्यावर भटके श्वान देखील येतात. त्यांना खाण्यासाठी बिबटे तेथे येऊ शकतात. एखाद्या श्वानाला संसर्ग झाल्यास ते बिबट्यासाठी देखील घातक आहे. कचरा उचलण्याचे काम महापालिकेचे आहे. त्यामुळे यास महापालिकाच जबाबदार ठरते. – रोहीत जोशी, येऊर एनव्हायर्नमेंटल सोसायटी, संस्थापक.

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, याबाबत तात्काळ कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.