डोंबिवली – मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील कोपर रेल्वे स्थानकात रविवारी दुपारी एका ३५ वर्षाच्या तरूणाने मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील एक्सप्रेसखाली झोकून आत्महत्या केली. या तरूणाचे नाव आणि त्यांची ओळख पटलेली नाही. अचानक घडलेल्या या प्रकाराने कोपर रेल्वे स्थानकातील प्रवासी काही क्षण घाबरले.

कोपर रेल्वे स्थानकात रविवार असल्याने तुरळक गर्दी होती. मोजकेच प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा बळाचे कमांडो रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. काही प्रवासी जिन्यावरून, रेल्वे मार्ग ओलांडून येजा करत होते. बराच उशीर एक तरूण कोपर रेल्वे स्थानकात रेंगाळत होता. तो प्रवासी म्हणून रेंगाळत असेल असे प्रवाशांना वाटले. हा तरूण ३५ वर्षाचा होता. त्याच्या पाठीला पिशवी होती.हा तरूण प्रवाशासारखा कोपर रेल्वे स्थानकात रेंगाळत होता.

तो जीवाचे बरेवाईट करण्यास आला आहे असे कोणाही प्रवाशाला वाटले नाही. काही वेळाने हा तरूण कोपर रेल्वे स्थानकात पूर्व बाजुच्या दिशेने फलाटावरून उडी मारून रेल्वे मार्ग ओलांडून पूर्व भागातील बालाजी गार्डन संकुलाच्या दिशेने जाऊ लागला. तो पूर्व भागात जात असावा असे प्रवाशांना वाटले. पण तेवढ्यात कल्याण दिशेकडून भरधाव वेगाने मुंबईला जाणारी एक्सप्रेस आली. हे रेल्वे मार्ग ओलांडून जाणारा तरूण पाहत होता. तरीही त्याने एक्सप्रेस जवळ येताच भरधाव वेगातील त्या एक्सप्रेसखाली स्वताहून झोकून उडी मारली. काही क्षणात तो एक्सप्रेस इंजिनच्या धडकेत दूरवर फेकला गेला.

हा प्रकार पाहताच कोपर रेल्वे स्थानकातील प्रवासी काही क्षण घाबरले. एक्सप्रेस तेथून निघून जाताच रेल्वे स्थानकातील कमांडोने ही माहिती तात्काळ डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या तरूणाला रग्णवाहिकेतून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे त्या तरूणाला मृत घोषित करण्यात आले.

या तरूणाचे नाव, त्याचे ओळख पटविण्याचे काम लोहमार्ग पोलिसांकडून सुरू होते. सुस्थितीत असलेल्या या तरूणाजवळ, त्याच्या पिशवीत काही चिठ्ठी सापडते का. त्याने ही आत्महत्या का केली या दृष्टीने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेऊन तपास सुरू केला आहे.

दोन दिवसापूर्वी डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवासी गर्दीचा धक्का लागून एका तरूणाचा रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला होता.