वेगाशी स्पर्धा करणाऱ्या माणसाला हल्ली ‘बटन स्टार्ट’ची सवय झाली आहे.  असं असताना पॅडल माराव्या लागणाऱ्या सायकलला कोण विचारणार? परंतु विशिष्ट ध्येयानं झपाटलेले आठ पुरुष आणि दोन महिला अशा दहा जणांचा ‘बियॉन्ड बॉर्डर्स ऑन बायसिकल्स’ नावाचा एक गट चक्क सायकलवरून युरोप पालथा घालण्यासाठी नुकताच रवाना झाला. पुढील तीस दिवसांमध्ये युरोपातील सहा देशांमधून सायकलिंग करत जवळपास १३०० किलोमीटरचे अंतर ते कापणार आहेत. धनंजय मदन, गिरीश महाजन, सुनील पाटील, वैशाली हळदवणकर, दीपा शेंबेकर, प्रकाश पटवर्धन, मनोज चौगुले, किशोर केणी, राजेशा पुट्टीगौडा आणि सतीश साठे असे हे दहा सायकलस्वार आणि त्यांचे चाकांवरचे अनुभवकथन आजपासून ‘ट्रेक-इट’मध्ये..

जवळपास वर्षभराच्या आयोजनानंतर २७ ऑगस्टला आम्ही युरोप सायकिलगच्या प्रवासाला जायला निघालो. २८ ऑगस्टला सकाळी चार वाजताची ‘फ्लाइट’ होती. आम्हाला निरोप द्यायला आमचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार विमानतळावर लोटला होता. मुंबई ते दुबई आणि दुबई ते पॅरिस असा पहिला विमानप्रवास होता. एकदाचे मार्गाला लागलो म्हणून आम्ही सर्वजण खूश होतो, पण खरा आनंद झाला ते आमचे पाय पॅरिसच्या विमानतळाला लागल्यावर. आम्ही सर्वानी एकच जल्लोष केला. विमानतळावर सगळं नवीन होतं. इथं फार कमी लोक इंग्रजी बोलतात. जास्तीत जास्त संवाद हा फ्रेंच भाषेतूनच. त्यामुळे आम्हाला लोकांशी काही वेळेला हातवारे करूनच बोलावं लागत होतं. त्यामुळे आमच्या हॉस्टेलच्या ठिकाणी जाण्यासाठी मेट्रो ट्रेनची तिकिटं काढताना लोकांशी संवाद साधण्याच्या पहिल्याच प्रसंगात फार धमाल उडाली. आमच्या सर्वाच्या सायकली या ‘बॉक्स पॅक’ होत्या. त्या पहिल्यांदा आम्ही मोकळय़ा केल्या. ‘मेट्रो स्टेशन’मधून बाहेर पडताना तर मोठी कसरत करावी लागली. येथे मशिनमधून एका बाजूनं तिकीट आत जातं आणि ते दुसऱ्या बाजूनं बाहेर येतं. तोपर्यंतच तुमच्यासाठी दरवाजा खुला होतो. त्यामुळे त्या दरवाजाच्या वरून आम्हाला आमच्या सायकल असलेल्या मोठय़ा बॅगा पलीकडे द्याव्या लागल्या. तिथून आम्ही गर्डुनॉल स्टेशनला पोहोचलो. प्रत्येकाकडे साधारण ३५ किलो वजन होतं. संध्याकाळी आम्ही पाच वाजता स्टेशनवर पोहोचलो तेव्हा ऑफीस सुटायची वेळ असल्यानं सर्वजण आमच्याकडे उत्सुकतेनं पाहात होते. आमची चौकशी करत होते. तो अनुभव वेगळा होता. परंतु आम्हाला तेथून ‘ला चेपेल’ स्टेशनला जायचं होतं. पण गर्डुनॉल ते ला चेपेलला जोडणारी गाडी नाही. तुम्हाला एकतर रस्त्यानं जावं लागतं नाहीतर टनेलमधून. आम्हाला बाहेरचा रस्ता माहीत नव्हता. मग आम्ही हा दीड किलोमीटरचा प्रवास टनेलमधूनच सायकलींची बॅग आणि इतर सामान खांद्यावर टाकूनच केला.
‘ला चेपेल’ इथं यूथ हॉस्टेलमध्ये आमची राहायची व्यवस्था होती. पॅरिसमधील हे यूथ हॉस्टेल नवीनच बांधलेलं आहे. त्याचं उद्घाटनही झालेलं नाही, पण ते राहण्यासाठी खुलं करण्यात आलं आहे. ‘जेटलॅग’ आणि सायकली वाहून चांगलीच दमछाक झालेली, पण थोडे स्थिरस्थावर होऊन आम्ही रात्री आजूबाजूचा परिसर पालथा घालायला बाहेर पडलो. पुढचे दोन दिवस पॅरिस फिरणं आणि सायकल जोडणं (असेंबल) यासाठी राखीव होते. सकाळी भटकल्यावर पहिल्या क्षणीच आम्हाला ‘सायकल पाथ’ म्हणजे नेमकी काय अद्भुत गोष्ट आहे ते पाहायला मिळालं. मुख्य रस्त्याच्या बाजूनं लाल रंगाचे हे ‘सायकल पाथ’ विशेषत: सायकलसाठीच तयार केलेले असतात. दिवसभर मेट्रोचा दोन दिवसांचा पास घेऊन गाव िहडलो. यात एक ८५० र्वष जुनं चर्च, उँं१’ी२ीि ॅं४’’ी हे होतं. जगप्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’ही पाहिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला लागलो. सायकली बाहेर काढल्या. तेव्हा असं कळलं, की सतीश साठे यांच्या सायकलच्या डिरेलरचा एक भाग तुटला आहे. मग तो भाग शोधण्यासाठी मेट्रोनं जवळपास अर्ध पॅरिस पालथं घातलं, तेव्हा तो मिळाला. ठरल्याप्रमाणे ‘आयफेल टॉवर’ला गेलो. तिथं जाताना सर्वाना चहा प्यावासा वाटला. तेव्हा जवळच एक टपरीसारखं छोटंसं हॉटेल दिसलं. जवळ गेल्यावर कळलं ते मीनू नामक दिल्लीच्या एका गृहस्थाचं आहे. तिथं आम्ही फ्रँकी खाल्ली आणि चहा प्यायलो. त्यानं आपुलकीनं चौकशी केली. आपले लोक कधी कधीच भेटतात म्हणून त्यानं फक्त फ्रँकीचेच पसे घेतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लवकर सायकली जोडायच्या होत्या. तिसऱ्या दिवशी ‘बुलेट ट्रेन’मधून ब्रसेल्सला जायचं होतं. त्याबाबत चौकशी केली असता कळलं, की जलद रेल्वेमधून सायकल घेऊन जाता येणार नाहीत. त्यामुळे कसं जायचं याची दुसरी योजना तयार केली. सकाळी जोडलेल्या सायकली चालवत स्टेशनवर नेल्या आणि तिथं ३० मिनिटांत या सायकली पुन्हा ‘डिसमँटल’ केल्या. खास सायकलींसाठी तयार केलेल्या बॅगेत त्या भरल्या. सायकल घेऊन ट्रेनमध्ये चढलो. यासाठी तिकीट कलेक्टरची मदत देखील लाभली. पॅरिस ते ब्रसेल हा प्रवास मुद्दामहून जलद रेल्वेनं केला. जे आपल्याकडे नाही त्याचा युरोपात अनुभव घेण्यासाठी हा प्रवास. ताशी तीनशे किलोमीटर वेगानं ही रेल्वे धावत होती. आम्ही सर्वजण हा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. ब्रसेल्सला उतरल्यावरच स्टेशनवरच आम्ही सायकल जोडल्या.  
बरोबर दुपारी बारा वाजता ब्रसेल ते अ‍ॅन्टवर्प हे आमचं पहिलं सायकिलग सुरू झालं. येथे सिग्नलला दुचाकी अन्य गाडय़ांबरोबरच सायकल थांबलेली असते. विशेष म्हणजे आम्ही दोन-तीन दिवसांमध्ये एकही ‘हॉर्न’ ऐकलेला नव्हता किंवा आम्हाला कोणी ‘कट’ मारून पुढे गेल्याचा अनुभव नव्हता. युरोपात उजव्या बाजूनं ड्रायिव्हग केलं जातं. त्यामुळे आमची थोडी धांदल उडत होती. कारण आपल्याकडे उलटय़ा दिशेनं म्हणजे डाव्या बाजूनं ड्रायिव्हग होतं. एवढंच नव्हेतर सायकल ट्रॅकवरही लोक उजव्या बाजूनंच सायकली चालवतात.
‘सायकलिंग’च्या पहिल्या दिवशी अंतर कमी होतं, पण रस्ता नवीन असल्यानं खूप वेळ लागत होता. मध्येच आम्ही रस्ताही भरकटलो आणि जवळपास तीन-चार किलोमीटर गवतावरूनही सायकल चालवली. लोकांना विचारायचो, पण भाषेमुळे रस्ता समजून घेण्यात अडथळे येत होते. पण असं असतानाही लोकांच्या स्वभावाचा एक वेगळा पलू आम्हाला अनुभवायला मिळाला. काही लोक स्वत:ची गाडी काढून आम्हाला जंक्शनपर्यंत सोडायला आले आणि ते पुन्हा मागे फिरले. एक माणूस तर आम्हाला स्वत:च्या गाडीनं आठ ते दहा किलोमीटपर्यंत रस्ता दाखवायला आला.
आम्ही सीन नदीच्या किनाऱ्यावरून जाताना मध्येच छोटा जंगलाचा पट्टा लागला. थोडय़ा वेळानं सपाटीवर आल्यावर कुठे जायचं कळत नव्हतं. त्या वेळी रस्त्याच्या कडेला एका गाडीवाल्याला विचारण्यासाठी आम्ही थांबलो. त्या वेळात त्याच्या मागे बऱ्याच गाडय़ा येऊन थांबल्या. पण त्या पाच ते सात मिनिटांत कुणीही ओव्हरटेक केले नाही किंवा कर्कशपणे हॉर्न वाजवला नाही.
इथं लोकांमध्ये खूप सहनशीलता आहे. ते मदतशील आहेत. नवनव्या उपक्रमांचे ते स्वागत करतात. पर्यावरणपूरक त्यांचे वर्तन ठेवतात. खेळांना उत्तेजन देतात.. सायकलच्या दोन चाकांवरील प्रवास करता करता आम्हाला या अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या शिकता शिकता नकळतपणेच आम्ही पहिल्यावहिल्या देशाची नेदरलँडची सीमा ओलांडत बेल्जियममध्ये प्रवेश केला.