अवीर प्रदीप जाधव….सामान्य घरातला असामान्य मुलगा….वय वर्षे अडीच…इतक्या कमी वयात सहा राष्ट्रीय विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्याचा एक विक्रम तर अनेकांना थक्क करणारा आहे. अवघ्या अडीच मिनिटांत तो २०८ देशांची नावं पटापट सांगतो. महाराष्ट्रातील या अचाट आणि अफाट बुद्धीमत्ता असलेल्या चिमुकल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. त्याचा व्हिडिओही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

गेल्याच महिन्यात अवीरनं वेगवेगळ्या स्पर्धा जिंकून आपल्या नावे सहा विक्रम नोंदवले आहेत. अवीरच्या आईनं काही महिन्यांपूर्वीच अवीरचा एक किस्साही ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितला होता. नकाशामध्ये भारत कुठे आहे, हे शोधण्याची उत्सुकता त्याला होती; तेव्हा नकाशा खरेदी करण्यासाठी त्यानं आपल्याकडे हट्ट धरला होता. नकाशातील भारत शोधल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. काही दिवसांनंतर जगाच्या नकाशातील इतर देशांची नावंही अवीर ओळखू लागला, असंही त्याच्या आईनं सांगितलं. नकाशावरील २०८ देशांची नावं तो अचूक सांगतो तीही फक्त २ मिनिटं ५५ सेकंदांत. इतकंच नाही तर ध्वज पाहून किंवा नकाशा पाहून तो देश ओळखणं, देशांच्या राजधानीची नावं झटक्यात सांगतो. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी त्यानं युरोपातील देशांची नावं अचूक सांगितली आणि उपस्थित सगळ्यांनाच त्यानं आश्चर्यचकित केलं.