महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे याचा एक फोटो सध्या ट्विटवर व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरे हे गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचे दिसत असून त्यांच्या बाजूला एक महिला बसल्याचे दिसत आहे. ही माहिला म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी असल्याचा दावा केला जात आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमधील वाद समोर येत असतानाच आदित्य ठाकरे हे सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीसोबत फिरत असल्याचा दावा काही ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आला आहे.

सुशांत हा मूळचा बिहारचा होता. त्यामुळेच आता बिहार पोलिसांनी त्याच्या वडीलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. यावरुनच सोशल नेटवर्किंगवरही मागील काही दिवसांपासून नेटकऱ्यांमध्येही महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार आणि बरोबर कोण मुंबई पोलीस की बिहार पोलीस असा वाद सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. अगदी हॅशटॅगपासून ते व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून दोन्ही बाजूचे समर्थक त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधताना आदित्य ठाकरेंचा हा फोटो उत्तर भारतामधील काही ट्विटर हॅण्डलवरुन व्हायरल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरेच सुशांतच्या प्रेयसीबरोबर म्हणजेच रियाबरोबर फिरत असल्याचे सांगत हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारला या प्रकरणामध्ये सीबीआयची चौकशी नको आहे असं सांगण्यासाठी हे जुने फोटो व्हायरल केले जात आहेत. तुम्हीच पाहा काही व्हायरल ट्विट्स…

उमानंदन मिश्रा या अकाउंटवरुन हा फोटो ट्विट करण्यात आला आहे. “जर उद्धव ठाकरेंचा मलुगा सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीसोबत फिरत आहे तर सुशांतच्या हत्येचा तपास सीबीआयकडून कसा केला जाईल?,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.

हा फोटो तीन हजार ९०० हून अधिक जणांनी रिट्विट केला आहे. त्याचप्रमाणे अंकिता दवे या नावाने असणाऱ्या ट्विटर हॅण्डलवरुनही हाच फोटो आणि याच कॅप्शनसहीत शेअर करण्यात आला आहे. हा फोटो पाच हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे.

काय आहे सत्य?

मात्र व्हायरल केला जाणारा हा फोटो अभिनेत्री दिशा पटानीचा आहे. हा फोटो मागील वर्षी म्हणजेच २०१९ साली आदित्य आणि दिशा एकत्र डिनरासाठी गेलेले असतानाच काढण्यात आला होता. यासंदर्भातील वृत्त तुम्ही येथे क्लिक करुन वाचू शकता.

दावा खोटा

त्यामुळेच सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला गेला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी खोट्या माहितीसहीत आदित्य आणि दिशा यांचा हा फोटो व्हायरल करण्यात येत असल्याचे स्पष्ट होतं आहे.