टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. तेव्हापासून सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनेल्सवर धोनीच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीनेही धोनी निवृत्त झाल्यामुळे माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण, युवराजला फोन लावताना या न्यूज चॅनेलने चांगलीच गफलत केली आणि युवराजऐवजी भलत्याच व्यक्तीला फोन लावला. त्यामुळे या चॅनेलची ‘Live फजिती’ झाली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी झी न्यूज या वृत्तवाहिनीने युवराज सिंगला फोन लावला. फोन कनेक्ट झाल्यानंतर चॅनेलच्या अँकरने, “युवराज सिंग आपल्यासोबत आहे…जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या खेळाडूने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतलाय….खूप भावूक करणारा क्षण आहे…” असं म्हणत युवराजला प्रतिक्रिया विचारली.

अँकरचं बोलणं संपल्यानंतर क्षणभर काहीही न बोलता समोरच्या व्यक्तीने दुसऱ्याच क्षणाला “मी तर युवराज सिंग बोलतच नाहीये…तुम्ही चुकीच्या माणसाला घेऊन आलात” असं म्हणत जोरजोरात हसायला सुरूवात केली. “मला खूप मजा आली…हा कोणता कार्यक्रम आहे, मी पण बघेन नंतर….तुमचा टीआरपी तर कमी नाही झाला ना?…असंही हा व्यक्ती म्हणाला.
पाहा व्हिडिओ –

या घटनेमुळे संबंधित न्यूज चॅनेलची चांगलीच फजिती झाली असून नेटकरी चॅनेलला ट्रोल करत आहेत.