तुम्ही जगातली सर्वांत लहान आकाराची पेन्सिल पाहिलीत का? तर हा फोटो पाहा. उत्तराखंडमधल्या हल्द्वानी जिल्ह्यातल्या एका अवलियाने ही सर्वांत लहान आकाराची पेन्सिल तयार केली आहे. लाकूड आणि एचबी लीडने तयार केलेल्या या पेन्सिलची लांबी ५ मिलीमीटर आणि रुंदी ०.५ मिलीमीटर इतकी आहे. आकाराने जरी लहान असली तरी तिला बनवण्यात तीन ते चार दिवस लागले. प्रकाशचंद्र उपाध्याय यांची ही किमया असून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.

या पेन्सिलचा प्रोजेक्ट उपाध्याय यांनी ‘असिस्ट वर्ल्ड रिसर्च फाऊंडेशन’कडे पाठवला. या फाऊंडेशनने त्यांचा प्रोजेक्ट स्वीकारत विश्वविक्रमात त्याची नोंद केली. उपाध्याय यांच्या नावावर हा एकच विक्रम नसून यापूर्वी त्यांनी जगातील सर्वांत लहान आकाराची हनुमान चालीसा लिहिलेल्या पुस्तकाची निर्मिती केली.

उपाध्याय यांच्याआधी उत्तर अमेरिकेच्या एका व्यक्तीने जगातील सर्वांत लहान पेन्सिल तयार करण्याचा विक्रम रचला होता. ती पेन्सिल १७.५ मिलीमीटर आकाराची होती. त्यामुळे उपाध्याय यांनी हा विक्रम बऱ्याच फरकाने मोडला. आता इतक्या लहान पेन्सिलने लिहिता येईल का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हो, याने लिहिता नक्की येतं, एका चिमट्याच्या साहाय्याने या पेन्सिलला पकडून लिहिता येतं.