उद्योजक रिचर्ड ब्रैन्सनच्या मालकीच्या व्हर्जिन हायपरलूप कंपनीने आपल्या प्रवासी सेवेच्या यंत्रणेची पहिली मानवी चाचणी पूर्ण केली आहे. रविवारी हायपरलूपची पहिली चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये दोन व्यक्तींनी हायपरलूपच्या पॉडमधून ताशी १६० किमी वेगाने प्रवास केला. अशापद्धतीने हायपरलूप सेवेची मानवी चाचणी करणारी व्हर्जिन हायपरलूप ही पहिली कंपनी ठरली आहे.सीटीओ (मुख्य तंत्रज्ञान अधिकारी) जोश गिगल आणि पॅसेंजर एक्सपिरियन्स निर्देशक सारा लुचियान या दोघांनी या चाचणीमध्ये सहभाग नोंदवत हायपरलूपच्या पहिल्या फेरीचा अनुभव घेतला. यासंदर्भातील व्हिडीओ, फोटो आणि माहिती कंपनीने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट केली आहे.

अमेरिकेतील नेवाडा प्रांतामध्ये कंपनीने निर्माण केलेल्या टेस्टींग ट्रॅकवरही ही मानवी चाचणी घेण्यात आली. पाच मीटर लांब आणि ३.३ मीटर रुंद या ट्रॅकवर चाचणी पार पडली. कंपनीने या पूर्वी या ट्रॅकवर ४०० हून अधिक मानविरहित चाचण्या केल्याचे म्हटले आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच मानवी चाचणी घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

या चाचणीदरम्यान चाचणीत सहभागी झालेल्या जोश आणि साराला आधी पॉडमध्ये बसवण्यात आलं. त्यानंतर पॉड ट्रॅकवर ठेवण्यात आला. सर्व काळजी घेत या पॉडच्या वेगाची चाचणी घेण्यात आली असता या पॉडने सर्वाधिक  १६० किमीचा वेग गाठल्याची नोंद करण्यात आली आहे. हा पॉड कंपनीच्या २८ आसनी एक्सपी-२ पेगसस या मॉडेलचे छोटे व्हर्जन आहे. भविष्यामध्ये कंपनी जगभरामधील अनेक देशांमध्ये ही सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे.

 

काय आहे हायपरलूप तंत्रज्ञान?

हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवासी किंवा सामानाची ने-आण करणे शक्य होते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या टय़ूबची (बोगदा) निर्मिती करावी लागते. या टय़ूबमध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डबे असतात. हे डबे टय़ूबमधील चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरून धावतात. टय़ूबमध्ये हवेचा प्रतिरोध नसल्याने आणि चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगाने धावू शकतात. एका डब्यामधून २८ ते ३० प्रवासी प्रवास करू शकतात. हायपरलूप ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगाइतका असल्याचा दावा केला जात आहे.

फडणवीस सरकारने महाराष्ट्रात हायपरलूपला दिलेली परवानगी

मागील वर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. पुणे-मुंबई या दोन महानगरांना हायपरलूप (हवा विरहित पोकळी) तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा हा अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प पुणे-मुंबई (वाकड ते कुर्ला बीकेसी) दरम्यान ११७.५० कि.मी. अंतरासाठी केला जाणार आहे. त्यासाठी ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक होणार असून अशा प्रकारचा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत प्रतितास ४९६ कि. मी. गती अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते मुंबई प्रवास केवळ २३ मिनिटांत शक्य होणार आहे असं त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१८ साली राज्याच्या शिष्टमंडळाने अमेरिका दौऱ्यादरम्यान नेवाडा येथील व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाच्या चाचणी केंद्रास भेट दिली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित हायपरलूपचे व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकले होते. ‘व्हर्जिन हायपरलूप’ आपल्या अभियंत्यांचे पथक लवकरच पुण्याला चाचणीसाठी पाठविणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. या प्रकल्पासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडी) पहिल्या टप्प्यात १५ किलोमीटरचा बालेवाडी ते गहुंजे असा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक)निश्चित केला होता. मात्र व्हर्जिन हायपरलूपच्या अभियंत्यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतरच हा मार्ग आणि त्यामधील स्थानके निश्चित करण्यात येणार असल्याचे ‘पीएमआरडी’ने म्हटले होते.

महाविकास आघाडी फारशी उत्सुक नाही

देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुणे-मुंबई ‘हायपरलूप’प्रकल्पासाठी नव्याने सरकारमध्ये आलेली महाविकास आघाडी फारशी उत्सुक दिसत नाहीय. जानेवारी महिन्यामध्ये त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेत दिले होते. ‘हायपरलूपचा प्रयोग जगात कुठेही झालेला नाही. हा प्रकल्प जगभरात कुठेही यशस्वी झाल्यास पुण्यात तो राबवायचा किंवा नाही हे ठरवू,’ अशा शब्दांत पवार यांनी हा प्रकल्प राबवण्यास सरकार उत्सुक नसल्याचे संकेत दिले. हा प्रकल्प यशस्वी होतो किंवा नाही, हे प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याची आपली आर्थिक क्षमता नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

वाहतूक क्षेत्रात क्रांती समजला जाणारा आणि जगातील प्रवासी वाहतूक प्रकल्प म्हणून पाहिला जाणारा पुणे-मुंबई ‘हायपरलूप’ प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतला आहे. तब्बल ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक या प्रकल्पात येणार होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प असून अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई या दरम्यानचा प्रवास केवळ २३ मिनिटांत शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च करून ११.८० किलोमीटर लांबीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यास तत्कालीन राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

हा प्रकल्प सुरू करण्याची आपली क्षमता नाही

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पासाठी आग्रही होते. त्यानुसार पीएमआरडीएकडून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला ‘पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून आणि डीपी वर्ल्ड एफझेडई, हायपरलूप टेक्नॉलॉजीज आयएनसी यांच्या भागीदारी समूहाला मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यासही फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे. याशिवाय या प्रकल्पासाठी नीती आयोगाने देखील पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, हा प्रकल्प सुरू करण्याची आपली क्षमता नाही. आगामी काळात हा प्रकल्प जगभरात कुठेही यशस्वी झाल्यास, त्याचा विचार करताना पुणे-मुंबईची गरज लक्षात घेतली जाईल. पुणे-मुंबई दरम्यान द्रुतगती महामार्गावर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बोगदा करण्याचे काम सुरू आहे. तो बोगदा पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक आणखी सुरळीत होईल. त्यामुळे या प्रकल्पाबद्दल सध्याचे सरकार फारसे उत्सुक नसले तरी भविष्यात हा प्रकल्प महाराष्ट्रात झाल्यास मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या २३ मिनिटांत शक्य होईल असं सांगितलं जात आहे.