नरेंद्र मोदी यांच्या नव्याने विस्तार करण्यात आलेल्या मंत्रिमंडळातील एक नेते एकेकाळी सायकलचे पंक्चर काढण्याचे काम करत होते. आता हे नेते नेमके कोण आहेत, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर मध्य प्रदेशमधील डॉ. वीरेंद्रकुमार खटीक गॅरेजमध्ये सायकलचे पंक्चर काढण्याचे काम करायचे.

याविषयी सांगताना खटीक म्हणतात, मी पाचवीमध्ये असल्यापासून वडिलांच्या गॅरेजमध्ये बसायचो. सुरुवातीला मी माझ्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करायचो. मात्र कालांतराने मी वडिलांकडून गॅरेजमधील सगळी कामे करायला शिकलो आणि नंतर हे गॅरेज मीच चालवायला लागलो. अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या खटीक यांनी बालकामगार विषयात पीएचडी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खटीक आजही आपल्या हिरव्या रंगाच्या स्कूटरवरुन शहरात फिरताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या साधेपणासाठी ते सामान्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लहानपणी चहा विकायचे. ते पंतप्रधान झाले तेव्हा देशातील सामान्य चहा विक्रेता पंतप्रधान होऊ शकतो या गोष्टीवर बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या होत्या. मात्र आता मोदींप्रमाणेच त्यांच्या नव्याने विस्तार करण्यात आलेल्या मंत्रिमंडळामधील एक नेतेही अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. डॉ. वीरेंद्रकुमार यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली होती. आतापर्यंत त्यांनी ६ वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे.