16 year Old Adivasi Girl Selected For NASA Project: अंतराळ संशोधनातील अग्रेसर संस्था नासा व भारतीय अंतराळ संशोधक संस्था (ISRO) च्या संयुक्त विद्यमाने लघुग्रह संशोधनातील अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोसाइटी फॉर स्पेस एजुकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट तर्फे आयोजित या उपक्रमातून काही विद्यार्थ्यांची नासाच्या शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे यामध्ये १६ वर्षीय आदिवासी कन्या रितिका ध्रुव हिची सुद्धा वर्णी लागली आहे. रितिकाने ब्लॅक होल संदर्भात केलेल्या अभ्यासपूर्ण संशोधनाने आयआयटी बॉम्बे व सतीश धवन स्पेस सेंटर येथील वैज्ञानिक खूपच प्रभावित झाले आहेत. तसेच त्यांनी रितिकाचे संशोधन अत्यंत सखोल असल्याचे म्हंटले आहे.
रितिका ध्रुव ही छत्तीसगढ येथील नयापारा या भागात आपल्या कुटुंबासह राहते. स्वामी आत्मानंद इंग्रजी माध्यमाच्या सरकारी शाळेत ती इयत्ता ११वीचे शिक्षण घेत आहे. नासाच्या प्रकल्पासाठी निवड होताच रितिकाचे कुटुंब व मित्रपरिवाराच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सुद्धा रितिका हिच्या या कामगिरीचे खूप कौतुक केले आहे. रितिकाचे वडील हे नयापारा भागात सायकल दुरुस्तीचे एक छोटेखानी दुकान चालवतात.
रितिकाने ब्लॅक होलबाबत केलेले संशोधन
जेव्हा रितिका ८ वीत शिकत होती तेव्हा तिने पहिल्यांदा अंतराळ विषयावरील एका प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला होता. तेव्हापासून तिला विज्ञान विषय अधिक आवडू लागला व अशा सर्वच स्पर्धांमध्ये ती सहभाग घेऊ लागली. यावेळी जेव्हा नासाच्या प्रकल्पासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले होते तेव्हा रितिकाने उत्साहाने यात सहभाग घेतला. यावेळी अंतराळातील निर्वात पोकळीत ब्लॅक होलमधील ध्वनीविषयी तिचा अभ्यास लक्षवेधी ठरला. सुरुवातीला विलासपूर येथील स्पर्धेत सहभागी होऊन तिने भिलाई येथी आयआयटीमध्ये आपले संशोधन सादर केले होते. दरम्यान, रितिकाला इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावर प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले होते.
23 वर्षीय भारतीय तरुणाला जागतिक बँकेत नोकरीची ऑफर; ना ऑनलाईन अर्ज ना वशिला उलट ‘हा’ मार्ग निवडला
महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांची निवड
रितिकासह देशभरातून ६ विद्यार्थ्यांची या नासाच्या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये आंध्रप्रदेशचा वोरा विघ्नेश आणि वेमप्ति श्रीयेर, केरळच्या ऑलिविया जॉन, महाराष्ट्रातील के.प्रणिता व श्रेयस सिंह यांचा समावेश आहे. श्रीहरिकोटा केंद्रात या ६ विद्यार्थ्यांना ६ ऑक्टोबर पर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे यानंतर नोव्हेंबरमध्ये इस्रोत एस्टोरायड प्रशिक्षण शिबिरात ते सहभागी होतील.