Job At World Bank: अपेक्षा कधीच सोडू नये कारण तुमच्या ध्येयासाठी केलेली मेहनत व घेतलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत. वत्सल नाहाटा या २३ वर्षीय मुलाने या वाक्याची खरोखरच प्रचिती येईल असे काम केले आहे. येल युनिव्हर्सिटीचा पदवीधर जागतिक बँकेत त्याच्या स्वप्नातील नोकरीसाठी प्रयत्न करत राहिला आणि ६०० ईमेल आणि ८० फोन कॉल्सनंतर अखेरीस त्याने आपल्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. वत्सलने आपला अनुभव लिंक्डइनवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. आतापर्यंत १५,००० हून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. तर या पोस्टला १०० हुन अधिक व्यक्तींनी शेअर केले आहे.

२०२० मध्ये कोविड-१९ दरम्यान या वत्सलचा प्रेरणादायी प्रवास सुरू झाला. तेव्हा तो प्रतिष्ठित विद्यापीठातील पदवी पूर्ण करणार होता. यावेळी जागतिक बँकेतून कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी सुरु होती मात्र अशा परिस्थितीत त्याने नोकरीसाठी अर्ज केला होता.

“येल विद्यापीठात शिक्षण घेताना माझ्याकडे नोकरी नव्हती अशात मी २ महिन्यांत पदवीधर होणार होतो. नोकरी नसल्याने अनेकदा आपण इथे का आलो आहोत असाही प्रश्न मनात येऊन गेला . आई-वडिलांनी फोन करून विचारपूस केल्यावर त्यांना उत्तर देता येत नव्हते. पण आपला पहिला पगार हा डॉलर्समध्येच मिळवायचा असे ध्येय मी मनाशी ठेवले होते त्यानुसार मी नेटवर्किंगच्या बळावर नोकरी शोधू लागलो. विशेष म्हणजे या पूर्ण प्रवासात जॉब पोर्टल्सवर नोकरीचा अर्ज करणे मी पूर्णपणे टाळले होते.

दोन महिन्यांत त्याने लिंक्डइनवर १५०० कनेक्शन विनंत्या पाठवल्या, ६०० कोल्ड-ईमेल लिहिले, ८० विचित्र कोल्ड-कॉल्स केले आणि कितीतरी नकार त्याने पचवले. याकाळात २०१० च्या ‘द सोशल नेटवर्क’ चित्रपटातील ‘द जेंटल हम ऑफ एन्झाईटी’ हे त्याने यूट्यूबवर सर्वाधिक ऐकलेले गाणे ठरले.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याला ४ जॉब ऑफर केल्या गेल्या. यामध्ये जागतिक बँकेची निवड केली. नोकरी ऑफर केल्यानंतर त्यांनी माझा व्हिसाचा खर्च सुद्धा करण्यास तयारी दर्शवली. जागतिक बँकेच्या सध्याच्या संशोधन संचालकांनी मशिन लर्निंग पेपरचे सह-लेखन करण्याची ऑफरही दिली आहे असे वत्सलने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) मधून वत्सलने अर्थशास्त्र पदवी प्राप्त केली आहे. या एकूण प्रवासात त्याने नेटवर्किंगची शक्ती अधोरेखित केली आहे. आता मी कोणत्याही परिस्थितीत टिकून राहू शकतो हा आत्मविश्वास आपण मिळवला. “तुम्ही अशाच गोष्टीतून जात असाल जिथे संपलंय असे वाटत असेल तर पुढे जा. तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकत राहा तुमच्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल असेही वत्सलने सांगितले आहे.