राज्यामध्ये सत्तापालट घडवणारे शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन. याचनिमित्त शिंदे यांनी सोशल मीडियावरुन दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कवितांच्या माध्यमातून विरोधकांना चिमटे काढणाऱ्या शिंदे यांनी आपल्या राजकीय गुरूला आंदरांजली वाहण्यासाठीही चारोळ्यांचा आधार घेतला आहे. शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे सूत्र पक्कं करण्यासाठी अगदी तळागाळापर्यंतच्या पोहचवण्याचे काम करणारा नेते म्हणून आजही आनंद दिघे यांच्याकडे पाहिलं जातं. ९० च्या दशकात शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असे जणू समिकरणच तयार झाले होते. याच आनंद दिघेंची आज २१ वी पुण्यतिथी… त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दाऊदच्या गुंडांपासून आनंद दिघेंना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनात घुसवली होती गाडी”

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिघे यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट केली आहे. “वंदनीय गुरूवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन” या कॅप्शनसहीत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे. आपल्या प्रत्येक भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आनंद दिघेंचा आवर्जून उल्लेख करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी शेअर केलेल्या फोटो पोस्टमध्ये आनंद दिघेंचा फोटो आणि त्याबाजूला चारोळी असल्याचं दिसत आहे.

ठाणे: उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न

तुमची शिकवण माझ्या मनामध्ये कायम कोरलेली असून मी तुमच्याच तत्वाचे आचरण करत आहे. मी जनसेवेचं व्रत हाती घेतलं असून माझ्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही अशा आशयाची चारोळी या फोटोवर लिहिलेली आहे. या फोटोवरील चारोळी खालीलप्रमाणे आहे –

उरात भरुनी सदैव आपले स्मरण,
मनामध्ये कोरली आहे कायम आपलीच शिकवण…
करीतो गुरूवर्य आपल्या तत्वांचे आचरण,
जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण…

>
ठाणे जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात शिवसेना अगदी मुख्य शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दिघे यांनी केले. शाखा संस्कृती ठाण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये दिघे यांचा सिंहाचा वाटा होता.

>
त्यांचे पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे असे होते.

>
आनंद दिघेंचा जन्म जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला.

>
ठाण्यातील सर्वात गजबजाटलेला परिसर म्हणून ओळख असणाऱ्या टेंभी नाका परिसरामध्ये त्यांचे घर होते. याच परिसरात असणाऱ्या सेंट्रल मैदान वगैरे भागांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. ते अगदी तरुणपापासून आनंद दिघे या सभांना आवर्जून उपस्थित रहायचे.

>
शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सामान्यांमधून पुढे आलेले आणि आपलेसे वाटणारे नेतृत्व हवे होते ती गरज आनंद दिघे यांनी पूर्ण केली. त्यांनी बाळासाहेबांपासून प्रभावित होऊन शिवसेनेसाठी काम करण्याचे ठरवले. ते सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यानंतर मजल दरमजल करत ते ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदापर्यंत पोहचले. अल्पावधीमध्येच आजही शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात दिघे प्रचंड लोकप्रिय झाले.

>
त्यांच्या खांद्यावर पक्षाने जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर ते टेंभी नाक्यावरील कार्यालयातच राहू लागले. त्यांनी स्वत:ला शिवसेनेच्या कामात पूर्णपणे झोकून दिले. अनेकदा कार्यकर्तेच त्यांना डबा आणून द्यायचे.

>
आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरातच ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. या आश्रमात दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरायचा. आपल्या तक्रारी दिघे यांना ऐकवण्यासाठी लोक सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावून उभे असायचे. ठाणे शहरच काय जिल्हाभरातील लोक येथे येऊन त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे. दिघे यांनी कधीच बघू करु अशी उत्तरे दिली नाहीत. अनेकदा ते तक्रार ऐकल्यानंतर तेथूनच फोन करायचे आणि तक्रार सोडवण्याच्या सूचना द्यायचे अशा आठवणी जुने शिवसैनिक आजही सांगतात. कधी कधी काम पूर्ण करुन घेण्यासाठी त्यांनी रोक’ठोक’ भूमिकाही घेतल्या आहेत. त्यांनी काही प्रसंगी हात उचलल्याचेही उदाहरणे आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल प्रशासनापासून सामान्यांपर्यंत एक आदरयुक्त दरारा तयार झाला.

>
दिघे यांनी स्थापन केलेले ‘आनंद आश्रम’ हे समांतर न्यायालयाच्या भूमिकेत काम करत असल्याची टीका त्यावेळी ठाण्यातील समाजवादी मंडळींनी केली होती.

>
दिघे यांना देवा-धर्माच्या कार्याची विशेष आवड होती. त्यांनीच टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव सुरु केला. सर्वात पाहिला मोठा दहिहंडी उत्सवही दिघेंनीच टेंभी नाक्यावर सुरु केला. आजही या दोन्ही उत्सवांसाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक आवर्जून येतात. त्यांच्या याच धार्मिक कार्यामुळे त्यांना शिवसैनिकांनी ‘धर्मवीर’ ही उपाधी दिली.
>
आनंद दिघे यांची सामान्यांमध्ये आपला नेता अशी ओळख होती. त्यामुळेच अगदी लहानसहान भांडणांपासून ते घरातील तक्रारींपर्यंत अनेक विषय दिघेंच्या जनता दरबारामध्ये यायचे. ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेंनी अनेक प्रयत्न केले अनेकांना स्टॉल उभारुन दिले. तर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या याच कामांमुळे आज त्यांच्या मृत्यूला दीड तप उलटून गेले तरी ठाणेकर दिघेंना विसरलेले नाहीत.

>
आनंद दिघेंचे ठाण्यातील कार्य इतके मोठे होते की स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबर इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही वेळेवेळी त्यांची दखल घेतली. फ्रंटलाईन या मासिकात  आनंद दिघेंसंदर्भातील लेखामध्ये त्यांच्या नेतृत्वाचे वर्णन करताना ‘दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तर ते ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ झाले होते’, असे मत मांडण्यात आले होते.

>
आनंद दिघे हे सण उत्सवांना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरी आवर्जून जात असतं. असेच ते २४ ऑगस्ट २००१ रोजी कार्यकर्त्यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त भेट देण्यासाठी बाहेर निघाले. याच दरम्यान ठाण्यातील वंदना टॉकीजसमोरील रस्त्यावर त्यांच्या गाडीला भिषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले तसेच डोक्यालाही मार लागला. त्यांना तात्काळ सिंघानिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे २६ तारखेला त्यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली.

>
२६ तारखेलाच संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारात त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. त्यानंतर जवळजवळ दहाच मिनिटांनी त्यांना हृयविकाराचा दुसरा मोठा झटका आला. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले. मात्र अखेर रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेव्हा दिघे यांचे निधन झाले ते अवघे ५० वर्षाचे होते.

>
दिघेंच्या निधनाची बातमी ठाण्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर रागाच्याभरात त्यांच्या १५००  चाहत्यांनी सिंघानिया हॉस्पिटलला आग लावली. या आगीमध्ये एक रुग्णवाहिका आणि २००  बेड जळून खाक झाले. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि नंतर ३४ जणांना अटक करण्यात आली.
>
उद्धव ठाकरे यांनीच आनंद दिघेंचे निधन झाल्याचे “आनंद दिघे आपल्यातून गेले,” अशा शब्दांमध्ये जाहीर केलं.

>
आजही ठाण्यामधील शिवसेनेच्या प्रत्येक पोस्टरवर आनंद दिघे यांचा फोटो असतोच.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand dighe death anniversary interesting facts about cm eknath shinde political guru scsg
First published on: 26-08-2022 at 11:03 IST