उत्तर प्रदेशमधील हरदोईमध्ये एका कारागीराने कुदळ, फावडे वापरून, चक्क जमिनीखाली दुमजली घर बांधले आहे. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहीतरी हटके करण्याची आवड असलेल्या या कारागीराने १२ वर्षांपासून हे घर बांधण्यासाठी मेहनत घेतली. किल्ल्यासारख्या बांधलेल्या या इमारतीमध्ये ११ खोल्या, एक मशीद, अनेक पायऱ्या, एक गॅलरी व एक ड्रॉइंग रूम आहे. वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना इरफान ऊर्फ पप्पू बाबा यांनी साकारला आहे. या अवलिया कारागीराचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही कौतुक केले आहे. आनंद्र महिंद्रा यांनी एक ट्विट शेअर करीत कारागीराला ‘शिल्पकार’, असे म्हटले आहे.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद्र महिंद्रा यांनी ट्विट करीत म्हटले की, हरदोई नामक एका व्यक्तीनं १२ वर्षांची मेहनत घेऊन, दुमजली भूमिगत घर बांधले आहे. ही गोष्ट अद्वितीय असून, खूपच सुंदर अशी आहे. तो माणूस एक शिल्पकार आहे. त्याच्यासारखे आणखी अनेक कल्पक व उत्कृष्ट असे वास्तुविशारद हवे आहेत.

इरफान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी २०११ मध्ये ही भूमिगत इमारत बांधण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत ते मोठ्या उत्साहाने सतत त्यात काही ना काही गोष्टी तयार करीत आहेत. या इमारतीची रचना त्यांनी अगदी राजमहालासारखी केली असून, इमारतीत ठिकठिकाणी नक्षीकाम केले आहे. कुदळीच्या साह्याने केलेले कोरीव काम पाहून एखाद्या प्राचीन राजवाड्याची अनुभूती येते.

या किल्ल्याप्रमाणे बांधलेल्या इमारतीला दोन दरवाजे आहेत. एका दरवाजातून प्रवेश करता येतो; तर दुसऱ्या दरवाजातून बाहेर जाता येते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मातीच्या पायऱ्या करून २० फूट खोल मशीदही बांधलेली पाहायला मिळेल. जिथे बसून इरफान नमाज अदा करतात. त्याशिवाय २० फूट खोल जमिनीत त्याने मोठा हॉल आणि राहण्यासाठी खोल्यादेखील बनवल्या आहेत. तसेच खांबाच्या साह्याने त्यांनी एक तिरंगा ध्वजही बनवला आहे. या मातीच्या भूमिगत इमारतीमध्ये २० फूट खोलीतून वर येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी त्यांनी पायऱ्याही बनवल्या आहेत.

इरफान यांच्या म्हणण्यानुसार, ही भूमिगत इमारत ज्या जमिनीवर बांधलीय, ती जमीन त्यांच्याच नावावर आहे. एके दिवशी त्यांना वाटलं की, यावर काहीतरी बनवलं पाहिजे. मग त्यांनी एकट्यानंच कुदळ, फावडं घेऊन ही इमारत बनवण्याचं काम सुरू केलं. त्यात हळूहळू त्यांचा रस वाढत गेला. या कामात त्यांनी स्वत:ला इतकं झोकून दिलं की, त्यांना खाणं, पिणं, घर या सगळ्या गोष्टी निरर्थक वाटत होत्या. त्यात त्यांची १२ वर्षं कशी गेली हेही समजलं नाही. हळूहळू ही किल्ल्यासारखी इमारत उभी राहिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी इरफान यांनी मातीपासून बनवलेल्या भूमिगत इमारतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. जो पाहिल्यानंतर लोक ती इमारत पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यांनी इमारतीच्या बाजूला वेगवेगळी झाडं-झुडपं लावली आहेत. त्यामुळे या इमारतीच्या आजूबाजूला नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे.