रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणे गरजेचं असतं. तुम्ही या नियमांचे पालन काटेकोरपणे करत आहात का हे पाहण्यासाठी रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली असते. एखादा लग्न समारंभ असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम, तर या वाहतूक पोलिसांची जबाबदारी आणखीन वाढते. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाहतूक पोलिसांनी दिल्लीतील लग्न सोहळ्यांपूर्वी एक खास यादी जाहीर केली आहे, जी प्रवाशांसह वाहनचालकांसाठीसुद्धा उपयोगी आहे.
दिल्लीतील लग्न सोहळ्यापूर्वी वाहतूक पोलिस विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतुकीसंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टनुसार, देशाच्या राजधानीत पुढील काही आठवड्यांत चार लाखांहून अधिक लग्न सोहळे पार पडणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिल्ली वाहतूक पोलिसांनी काही ठिकाणांची यादी नमूद केली आहे, जिथे जास्त रहदारी असणे अपेक्षित आहे. ट्रॅफिक पोलिसांनी शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा बघा.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी शेअर केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, वाहतूक सल्ला : “लग्नाच्या सीझनमुळे काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी जाणवेल. कृपया कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी या नियमांचे आणि सल्ल्यांचे पालन करा”, असे दिल्ली वाहतूक पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले आहे आणि दोन फोटोदेखील शेअर केले आहेत. यात त्यांनी मंदिर, फ्लायओव्हर, काही मार्ग अशा अनेक रस्त्यांची नावे नमूद केली आहे आणि यादी तयार करण्यात आली आहे, जिथे वाहतूक कोंडी होऊ शकते.
हेही वाचा…डबल डेकर बस पाहिली असेल, पण सायकल कधी पाहिली का? काकांचा भन्नाट जुगाड Video पाहून युजर्स म्हणाले…
पोस्ट नक्की बघा :
तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी यादीत नमूद केलेल्या रस्त्यांवर गर्दी किंवा वाहतूक कोंडी असेल तर कोणत्या पर्यायी रस्त्यांचा तुम्ही उपयोग करू शकता हेसुद्धा सांगितलं आहे. तसेच वाहनचालकांसाठीसुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत की, लग्न सोहळ्याच्या वेळी रस्त्यावर कुठेही गाडी पार्क न करता पार्किंगच्या जागेतच गाडी पार्क करावी. तसेच यादरम्यान प्रवाशांनी डीटीसी बस, मेट्रो यांचा उपयोग करा, असेसुद्धा सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट दिल्ली ट्रॅफिक पोलिस यांच्या अधिकृत @dtctraffic या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच त्यांनी अगदीच खास पद्धतीत वाहनचालक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. तसेच ट्रॅफिक नियमांची आठवण करून देत अशा लग्न सोहळ्यादरम्यान प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी कशाप्रकारे प्रवास केला पाहिजे, हे एकंदरीत त्यांच्या पोस्टमधून सांगितले आहे.