Bride Died By Heart Attack: आजकाल अकाली मृत्यूचे प्रमाण फार वाढले आहे. दररोज यासंबंधीचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडेल, याचा काहीच नेम नाही. एखाद्या क्षणी आनंद, तर दुसऱ्याच क्षणी दु:खाचे मळभ पसरलेले असते. अगदी काही सेकंदांत माणूस या जगातून निघून जाईल, याची कुणालाही कल्पना नसते. आता तरुण आणि अगदी लहान मुलांनाही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंबंधित काही व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे तुम्ही पाहिलेही असतील. असे व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे, जिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
दीक्षाच्या पालकांनी कधीही विचार केला नसेल की, त्यांना जिला निरोप देण्याची तयारी करीत होते, तिचे अंतिम संस्कार करावे लागतील. उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, लग्नाच्या एक दिवस आधी २२ वर्षीय वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना इस्लामनगर पोलिस ठाणे परिसरातील नुरपूर पिनोनी गावात घडली.
पीटीआयने वृत्त दिले आहे की, कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री हळदी समारंभात दीक्षा तिच्या बहिणी आणि नातेवाइकांसोबत नाचत होती, तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडू लागली. कुटुंबाने सांगितले की ती बाथरूममध्ये गेली, जिथे ती बेशुद्ध पडली आणि हृदयविकाराने तिचा मृत्यू झाला.
अहवालानुसार, तिचे वडील दिनेश पाल सिंग म्हणाले की, जेव्हा ती बराच वेळ बाहेर आली नाही तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा ठोठावला; पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. डॉक्टरांनी तिला जागीच मृत घोषित केले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दीक्षाचे लग्न सोमवारी मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी गावातील रहिवासी सौरभशी होणार होते, जो एका स्थानिक कारखान्यात काम करतो. त्याच दिवशी नवरदेवाची वरात मुरादाबादहून येणार होती. लग्नाची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती आणि घरी अनेक नातेवाईकही जमले होते.
येथे पाहा व्हिडीओ
इस्लामनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी विशाल प्रताप सिंह म्हणाले की, कुटुंबाने तक्रार दाखल करण्यास नकार दिला आणि शवविच्छेदन करण्यासही नकार दिला.